अजिंठा लेणी परिसरात अवैध धंद्यांचे थैमान; पर्यटकांना त्रास

 


पोलिसांचे दुर्लक्ष की अर्थपूर्ण संबंध? नागरिकांचा सवाल

सोयगाव: सोयगाव तालुक्यातील जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या अजिंठा लेणी परिसरात अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले असून, ते रोखण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप होत आहे. फर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे प्रकार सर्रास सुरू आहेत.

फर्दापूर, जामठी, सावळदबारा परिसरात मटका, जुगार, गावठी दारू आणि अवैध देशी दारू खुलेआम विकली जात आहे. यामुळे अजिंठा लेणीला भेट देणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांना तसेच स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरुण वर्ग व्यसनाधीनतेकडे वळला असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.फर्दापूरमध्ये गावाबाहेर नदीकाठी राममंदिराच्या मागे, बंगला मस्जिदच्या पाठीमागे असलेल्या नाल्यात, फर्दापूर-सोयगाव रस्त्यावरील बखर येथे, फर्दापूर-जळगाव रस्त्यावरील एचपी पेट्रोल पंपाजवळ आणि फर्दापूर-वरखेडी रस्त्यावर काही अंतरावर असलेल्या बिल्डिंगमध्ये जुगाराचे अड्डे चालतात, असे नागरिकांचे म्हणणे आहे. जामठी, घाणेगाव, सावळदबारा, देव्हारी आणि इतर ग्रामीण भागांमध्येही अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत.

या अवैध धंद्यांना रोखण्यात ग्रामीण पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड अपयशी ठरत आहेत की ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. स्थानिक पोलीस प्रशासनापासून ते ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत अवैध धंदे चालवणारे आणि अधिकारी यांच्यात हितसंबंध आहेत, अशी चर्चा सुरू आहे.

ग्रामीण पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सिल्लोड यांचे विशेष पथक असूनही कारवाई का होत नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. अवैध धंदेवाले, स्थानिक पोलीस आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत असलेले संबंध तोडून पोलीस अधीक्षक कारवाई करण्यात यशस्वी होतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

------------------------------------------

#फर्दापूर #अवैधधंदे #पोलिस #गुन्हेगारी #महाराष्ट्र #Crime #IllegalActivities #Maharashtra

अजिंठा लेणी परिसरात अवैध धंद्यांचे थैमान; पर्यटकांना त्रास अजिंठा लेणी परिसरात अवैध धंद्यांचे थैमान; पर्यटकांना त्रास Reviewed by ANN news network on ५/१६/२०२५ ०७:२२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".