पिंपरी चिंचवड, दि. २४: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील विविध विभागांची कार्यपद्धती आणि शहरात सुरू असलेल्या विकासकामांचा सखोल अभ्यास करण्यासाठी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनाला भेट दिली. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी या भेटीदरम्यान मीरा भाईंदरच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या या शिष्टमंडळात अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, अतिरिक्त शहर अभियंता दीपक खांबीत, कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर, अग्निशमन केंद्र अधिकारी प्रकाश बोरडे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी सहभागी झाले होते.
दौऱ्याच्या सुरुवातीला आयुक्त शेखर सिंह यांनी मीरा भाईंदरच्या आयुक्तांचे स्वागत केले. त्यानंतर पिंपरी चिंचवड मनपाच्या शहर अभियंता मकरंद निकम यांनी 'रोड असिस्टंट अँड मॅनेजमेंट सिस्टीम'ची माहिती दिली, तर सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी करसंकलन प्रणाली विषयी सादरीकरण केले. उपआयुक्त अण्णा बोदडे यांनी बचत गटांच्या माध्यमातून होणारे मालमत्ता कर संकलन आणि झोपडपट्टी भागातील कर वसुली यावर प्रकाश टाकला.
मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी 'डीएमएस' आणि अन्य संगणक प्रणालींची माहिती दिली. सह शहर अभियंता बापू गायकवाड यांनी शहरातील वाहतूक व्यवस्थापन, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता हरविंदरसिंग बन्सल यांनी पर्यावरण, जलःनिसारण आणि 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पांविषयी माहिती दिली. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी आरोग्य सेवा, उपआयुक्त प्रदीप ठेंगल यांनी नागरी सुविधा केंद्र, प्रशासन अधिकारी संगिता बांगर यांनी शिक्षण विभाग आणि सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे यांनी उद्यान विभागाच्या कार्याची माहिती दिली.
उपआयुक्त राजेश आगळे यांनी आकाशचिन्ह आणि परवाना प्रक्रिया, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी समाज विकास विभागाचे कामकाज स्पष्ट केले. याव्यतिरिक्त, इतर विभागप्रमुखांनीही संगणकीय सादरीकरण केले. मीरा भाईंदरच्या अधिकाऱ्यांनी विविध विभागांचे प्रत्यक्ष निरीक्षण केले आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून अधिक माहिती जाणून घेतली.
शिष्टमंडळाने रस्ते विकास विभागाच्या 'जीआयएस' प्रणालीद्वारे रस्त्यांचे मोजमाप आणि इतर विकासकामांची माहिती घेतली. उद्यान विभागाच्या १९७ उद्यानांची माहिती आणि बायोडायव्हर्सिटी पार्क उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले. समाज विकास विभागाच्या दिव्यांग भवन, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, लिनियर गार्डन, कासारवाडी येथील जलःनिसारण प्रकल्प, कचरा व्यवस्थापन प्रकल्प, सायन्स पार्क, पिंपळे गुरव येथील डायनोसार पार्क यांसारख्या विविध ठिकाणी भेटी देऊन तेथील कार्यपद्धतीची माहिती घेतली.
संपूर्ण अभ्यास दौऱ्यात मीरा भाईंदरच्या अधिकाऱ्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कामकाजाचे कौतुक केले आणि आयुक्त शेखर सिंह यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या उपक्रमांची प्रशंसा केली. आगामी काळात पिंपरी चिंचवडमधील स्तुत्य उपक्रम मीरा भाईंदरमध्येही राबविण्याचा मानस शिष्टमंडळातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
------------------------------------------------------------------------------------------------------- #PimpriChinchwad #MiraBhayandar #MunicipalCorporation #StudyTour #UrbanDevelopment #GoodGovernance
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा