पुणे, दि. २५: 'डीईएस पुणे युनिव्हर्सिटी' आणि 'चाणक्य मंडल परिवार' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'स्पर्धा परीक्षांद्वारे करिअर' या मार्गदर्शन मेळाव्याला आज फर्ग्युसन कॉलेजच्या अँफीथिएटरमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. यूपीएससी, एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांची माहिती देणाऱ्या या मेळाव्यात करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता.
माजी सनदी अधिकारी आणि चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक-संचालक अविनाश धर्माधिकारी आणि रोहिणी गुट्टे यांनी या विशेष सत्रात मार्गदर्शन केले. 'डीईएस पुणे युनिव्हर्सिटी'चे अध्यक्ष रवींद्र आचार्य, गंगनाथ झा, डॉ. शीतल रुईकर आणि स्वप्नील मुंगळे या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
मार्गदर्शकांनी यूपीएससी, एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांची ओळख, तयारीची योग्य दिशा, अभ्यासाचे तंत्र यावर सखोल मार्गदर्शन केले. अविनाश धर्माधिकारी यांनी स्पर्धा परीक्षांच्या तयारीचे महत्त्व विशद करताना सांगितले की, या तयारीतून केवळ करिअरच नव्हे, तर देशसेवेचे उद्दिष्टही साधता येते. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात या अभ्यासाचा उपयोग होतो आणि अधिकाऱ्यांनी भ्रष्ट मार्गांपासून दूर राहून लोकसेवक म्हणून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या मेळाव्यात 'डीईएस पुणे युनिव्हर्सिटी'मध्ये 'चाणक्य मंडल परिवार'च्या सहकार्याने उपलब्ध असलेल्या 'बीए सिव्हिल सर्व्हिसेस अँड पब्लिक पॉलिसी' आणि 'एमए पब्लिक पॉलिसी' या यूजीसी मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांची माहिती देण्यात आली. हे अभ्यासक्रम स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असल्याचे सांगण्यात आले.
रवींद्र आचार्य यांनी प्रशासकीय सेवांमध्ये राष्ट्र निर्मितीमध्ये योगदान देण्याची संधी मिळते, असे सांगितले. रोहिणी गुट्टे यांनी स्पर्धा परीक्षेच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आवश्यक असलेल्या कौशल्यांविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर पाटील यांनी केले. या मेळाव्यात दहावी, बारावी आणि पदवीचे विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--------------------------------------------------------------------------------------------------
#Pune #CareerGuidance #CompetitiveExams #UPSC #MPSC #DESUniversity #ChanakyaMandal
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा