५.१ कोटी रुपयांचे सोने जप्त, दोघांना अटक
मुंबई, दि. १८: मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई करत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण ५.७५ किलो सोने जप्त केले आहे. या सोन्याची अंदाजित किंमत ५.१० कोटी रुपये इतकी आहे. अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत हे सोने आरोपींनी त्यांच्या आतील कपड्यांमध्ये आणि जॅकेटच्या खिशामध्ये लपवलेले आढळले. या प्रकरणी दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.
पहिली घटना :
प्रस्थान क्षेत्रातून कर्मचाऱ्यांच्या मार्गाने जात असलेल्या एका विमानतळ कर्मचाऱ्याला सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी संशयावरून थांबवले. त्याच्या आतील कपड्यांची झडती घेतली असता, मेणाच्या स्वरूपात असलेली सोन्याची भुकटीची ६ पाकिटे जप्त करण्यात आली. या सोन्याचे निव्वळ वजन २८०० ग्रॅम (एकूण वजन २९४७ ग्रॅम) असून त्याची अंदाजित किंमत २.४८ कोटी रुपये आहे. प्राथमिक तपासात हे सोने त्याला विमानतळावर तात्पुरता थांबा घेतलेल्या ( transit passenger) प्रवाशाने दिल्याचे समोर आले आहे. या कर्मचाऱ्याला तात्काळ अटक करण्यात आली आहे.
दुसरी घटना :
प्रस्थान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या बाहेर पडण्याच्या ठिकाणी एका कंत्राटी कर्मचाऱ्याला थांबवून त्याची तपासणी करण्यात आली. त्याच्या जॅकेटच्या खिशामध्ये मेणाच्या स्वरूपात लपवलेली सोन्याची भुकटीची ६ पाकिटे अधिकाऱ्यांनी जप्त केली. या सोन्याचे निव्वळ वजन २९५० ग्रॅम (एकूण वजन ३०७३ ग्रॅम) असून त्याची अंदाजित किंमत २.६२ कोटी रुपये आहे. या प्रकरणातही प्राथमिक तपासात हे सोने त्याला विमानतळावर तात्पुरता थांबा घेतलेल्या (transit passenger) प्रवाशाने दिल्याचे दिसून आले आहे. या कर्मचाऱ्याला देखील अटक करण्यात आली आहे.
सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या या संयुक्त कारवाईमुळे विमानतळावरील सोन्याची तस्करी उघडकीस आली आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये अटक केलेल्या व्यक्तींची कसून चौकशी सुरू असून, या तस्करीच्या नेटवर्कमधील इतर सदस्यांचा शोध घेतला जात आहे.
----------------------------------------------
Reviewed by ANN news network
on
५/१९/२०२५ १०:४१:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: