रविवार, १८ मे, २०२५

खासदार श्रीरंग बारणेंची 'ऑक्सिजन पार्क'ला भेट; इतर सोसायट्यांना उद्यान विकसित करण्याचे आवाहन

 

पिंपरी, दि. १८: मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी रविवारी निगडी, प्राधिकरणातील सेक्टर नंबर २६ येथील ऑक्सिजन पार्क रेजीडेन्सी असोसिएशनने विकसित केलेल्या 'ऑक्सिजन पार्क' उद्यानाला भेट दिली. उद्यानात फिरून त्यांनी औषधी वनस्पती आणि विविध पक्ष्यांची माहिती घेतली. शहरातील इतर सोसायट्यांनीही अशा प्रकारचे उद्यान विकसित करावे, असे आवाहन खासदार बारणे यांनी केले.

यावेळी राजेंद्र बाबर, ऑक्सिजन पार्क रेजीडेन्सी असोसिएशनचे अध्यक्ष विजय कुमार नाईक, सचिव धनंजय कदम, देवेंद्र खडसे, सोनल कुमार सिंधी आदी उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, "ऑक्सिजन पार्क रेजीडेन्सी असोसिएशनने मोकळ्या जागेचा योग्य उपयोग करून ऑक्सिजन पार्क विकसित केले आहे. या उद्यानात अनेक औषधी वनस्पती आणि १७०० विविध प्रकारची झाडे आहेत. ही झाडे जगवण्यासाठी सामाजिक दायित्व निधीतून खर्च केला जात आहे आणि पाण्याची योग्य व्यवस्था केली जात आहे. झाडांची अतिशय काळजीपूर्वक निगा राखली जाते. नागरी वस्तीमध्ये इतके सुंदर ऑक्सिजन पार्क विकसित करणे कौतुकास्पद आहे. या ठिकाणी विविध प्रजातींचे पक्षीही येतात, ज्यामुळे रहिवाशांना पक्ष्यांच्या सान्निध्यात राहण्याचा अनुभव मिळतो. ऑक्सिजन पार्कचा आदर्श घेऊन इतर सोसायट्यांनीही अशा प्रकारचे उद्यान विकसित करावे. यामुळे जास्तीत जास्त वृक्ष लागवड होईल आणि सोसायटी परिसरातील वातावरण पर्यावरणपूरक राहील. तसेच मुलांना झाडे आणि पक्ष्यांची माहिती मिळेल."

--------------------------------------------------------------------------------

#PimpriChinchwad #ShrirangBarne #OxygenPark #SocietyGarden #EnvironmentalInitiative #MaharashtraNews #LocalNews #SocialResponsibility

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा