निगडी (पिंपरी चिंचवड), दि. १९ मे २०२५ : समरसता गतिविधी आणि भटके विमुक्त विकास परिषदेतर्फे नाथपंथी डवरी गोसावी समाजातील व्यक्तींना जात दाखले वाटप समारंभ दत्तोपंत म्हसकर न्यास सभागृह, निगडी येथे नुकताच संपन्न झाला. तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा आणि गोरक्षनाथ जयंतीच्या औचित्याने आयोजित या विशेष कार्यक्रमास समाजातील मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीषजी प्रभुणे होते. व्यासपीठावर पिंपरी चिंचवड तहसीलदार जयराज देशमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे, समरसता गतिविधी पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंडळ सदस्य विलास लांडगे आणि भटके विमुक्त परिषद महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्या (महिला आयाम) सौ. शुभांगी तांबट यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीला आणि भगवान गोरक्षनाथ प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. समरसता गतिविधी प्रांत कार्यकारिणी सदस्या वेणू साबळे यांच्या सुस्वर बुद्ध वंदनेने कार्यक्रमास औपचारिक सुरुवात झाली.
जात प्रमाणपत्र वितरणासंदर्भात परिषदेचे हितरक्षक जितेंद्र ठाकूर यांनी भूमिका मांडली. त्यांनी पालावर जीवन जगत असलेल्या भटक्या समाजाला जात प्रमाणपत्र मिळण्यातील अडचणी आणि समस्यांचा पाढा वाचत परिषदेने समाजाच्या सर्वेक्षणासाठी घेतलेल्या परिश्रमांची माहिती दिली. शासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीचे आणि गृह भेटीचे महत्त्व त्यांनी प्रतिपादन केले.
ॲडव्होकेट मुकुंद यदमळ यांनी भटके विमुक्त परिषदेच्या स्थापनेची आवश्यकता समजावून सांगितली. त्यांनी भारतातील समग्र भटके विमुक्त समाजातील समस्यांचा आढावा घेत शासकीय पातळीवर परिषदेने केलेल्या कामाचा लेखाजोखा सादर केला.
नरेंद्र पेंडसे यांनी नाथ संप्रदायाचे महत्त्व सांगितले. त्यांनी भटके विमुक्त समाजाला नाथ संप्रदायाचा समृद्ध वारसा असल्याचे सांगत हीच परंपरा ज्ञानेश्वरांनी भक्ती मार्गात आणि खऱ्या अर्थाने समरसतेत विलीन केल्याचे मत व्यक्त केले.
समरसता गतिविधी पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंडळ सदस्य विलास लांडगे यांनी भटके विमुक्त समाज, नाथ संप्रदाय, गौतम बुद्ध आणि समरसता यांचे परस्पर संबंध विशद केले.
भटके विमुक्त परिषद महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्या सौ. शुभांगी तांबट यांनी भटके विमुक्त समाजातील महिलांच्या समस्या मांडल्या. त्यांनी समाजाच्या सर्वेक्षणाची आकडेवारी सादर करीत बराच समाज अजूनही जात दाखल्यांपासून वंचित असल्याचे सोदाहरण स्पष्ट केले.
तहसीलदार जयराज देशमुख यांनी परिषदेने केलेल्या सर्वेक्षणाचे कौतुक केले. त्यांनी शासकीय योजनांसाठी जात पडताळणी दाखला प्राप्त करावा असे सांगत समाजासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली आणि सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
अध्यक्षीय भाषणात पद्मश्री गिरीषजी प्रभुणे यांनी भटके विमुक्त समाजातील बलस्थाने आणि परंपरेने चालत आलेल्या समृद्ध कौशल्य ज्ञान संपदेचा आढावा घेतला. त्यांनी ब्रिटिश राजवटीमुळे समाज देशोधडीला लागल्याचे सांगत स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनंतरही समाजासाठी खूप काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. जात दाखल्याचे महत्त्व समजावून सांगत त्यांनी तहसीलदार जयराज देशमुख यांचे मनापासून कौतुक केले.
कार्यक्रमाला श्री खंडोबा श्री क्षेत्र जेजुरी संस्थानचे अध्यक्ष अनिल सौंदडे, मातंग साहित्य परिषदेचे अध्यक्ष धनंजय भिसे, भटके विमुक्त परिषदेचे प्रशांत शास्त्रबुद्धे, समरसता गतिविधी संयोजक सोपान कुलकर्णी यांच्यासह नाथपंथी डवरी गोसावी समाजातील मोठ्या संख्येने युवक-युवती आणि महिला उपस्थित होत्या.
परिषदेचे कार्यवाह ललित कासार यांनी आभार प्रदर्शन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
-------------------------------------------------------------------------------
#BhatkyaVimuktSamaj #CasteCertificate #NomadicTribes #SocialJustice #NathpanthiCommunity #PimpriChinchwad #SocialWelfare #MaharashtraNews #TribalRights #CommunityDevelopment

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा