कोंढवा पोलिसांची कारवाई
पुणे, दि. २३: कोंढवा परिसरात खंडणी उकळण्यासाठी एका व्यक्तीला डांबून ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. कोंढवा पोलिसांनी तत्पर कारवाई करत अवघ्या चार तासात या व्यक्तीची सुटका केली असून, या प्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी सोनल ऊर्फ सोनी अतुल रायकर हे लहानपणापासूनचे मित्र आहेत. २१ मे २०२५ रोजी सायंकाळी सोनलने फिर्यादीला तिच्या एन.आय.बी.एम. येथील घरी चहा पिण्याच्या बहाण्याने बोलावले. घरी गेल्यावर सोनल आणि तिचा पती अतुल रायकर तसेच त्यांचे साथीदार रॉबीन ऊर्फ रवी मंडल व सुरेश ऊर्फ सुशांत यांनी फिर्यादीच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्यांना जखमी केले. त्यानंतर त्यांनी फिर्यादीच्या तोंडात बोळा कोंबून हातपाय दोरीने बांधले आणि एका खोलीत डांबून ठेवले. आरोपींनी फिर्यादीकडील एटीएम कार्ड आणि मोबाईल काढून घेत, पैसे व घरातील दागिने न दिल्यास मारण्याची धमकी दिली. इतकेच नव्हे, तर आरोपींनी फिर्यादीच्या मोबाईलवरून त्यांच्या पत्नीला मेसेज करून घरातील दागिने व पैसे काढून ठेवण्यास सांगितले आणि ते घेण्यासाठी माणूस पाठवत असल्याचेही नमूद केले.
या घटनेची माहिती रात्रगस्त अधिकारी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सुकेशिनी जाधव यांना मिळताच त्यांनी तातडीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनय पाटणकर आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. रौफ शेख यांना कळवले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहसिण पठाण, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सुकेशिनी जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश जाधव आणि तपास पथकातील पोलीस अंमलदार लक्ष्मण होळकर व सुरज शुक्ला यांनी आरोपींच्या प्लॅटचा शोध घेतला. आरोपींनी फिर्यादीला सनश्री सनटेक सोसायटी, रिम्स कॉलेज चौक, एन.आय.बी.एम. रोड, कोंढवा खुर्द, पुणे येथील त्यांच्या फ्लॅटमध्ये डांबून ठेवले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अवघ्या चार तासात फिर्यादीची सुटका केली.
याप्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये सोनल ऊर्फ सोनी अतुल रायकर (वय ३५), अतुल दिनकर रायकर (वय ३८), रॉबीन ऊर्फ रवी मंडल (वय २४) आणि सुरेश ऊर्फ सुशांत कुमारसुरवाती हान (वय ३१) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३०८ (४), ३५२, ११५ (२), १२६ (२), १२७ (२), ६१ (२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक रवींद्र गावडे करत आहेत.
ही यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ०५, पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रौफ शेख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नवनाथ जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहसिन पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश जाधव, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सुकेशिनी जाधव, पोलीस उप-निरीक्षक रवींद्र गावडे आणि पोलीस अंमलदार लक्ष्मण होळकर व सुरज शुक्ला यांच्या पथकाने केली आहे.
--------------------------------------------------------------------
#PuneCrime #KondhwaPolice #RansomKidnapping #Arrested #PoliceAction #MaharashtraPolice #CrimeNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: