पिंपरी, १६ मे २०२५: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत असलेले बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टम (बीआरटीएस) कॉरिडॉर शहरातील सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्वपूर्ण अंग बनले आहेत. पुणे महानगर क्षेत्रातील ११ लाख पीएमपीएमएल प्रवाशांपैकी सुमारे २२ टक्के म्हणजेच दररोज २ लाख ४५ हजार नागरिक बीआरटीएस कॉरिडॉरवरून प्रवास करत आहेत. पाच कॉरिडॉरवर दररोज सुमारे ४ हजार ६०० बस फेऱ्या होत असून यामुळे बीआरटीएस ही शहरातील अत्यावश्यक सार्वजनिक वाहतूक सेवा ठरली आहे.
शहरात सध्या निगडी-दापोडी, दिघी-आळंदी, सांगवी-किवळे, काळेवाडी-चिखली आणि नाशिक फाटा-वाकड असे पाच बीआरटीएस कॉरिडॉर कार्यरत आहेत. हे कॉरिडॉर शहराच्या पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण भागातील महत्त्वाच्या जवळपास १११ मार्गांना जोडतात. त्यामुळे ही बीआरटीएस सेवा पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा कणा बनली आहे.
बीआरटीएसचे आकर्षण: वेळेची बचत आणि सुलभ प्रवास
शहरातील अंदाजे सुमारे ९६ टक्के लोकसंख्या बस थांब्याच्या ५०० मीटर अंतरात राहते, असे आकडेवारीवरून दिसून येत आहे. बीआरटीएसच्या स्वतंत्र मार्गिका आणि प्रवाशांची गर्दी असणाऱ्या वेळेत बसची दीड ते सहा मिनिटांच्या फ्रीक्वेन्सीमुळे प्रवासाचा वेळ कमी होत आहे. हे प्रवाशांना मिळणारे मोठे फायदे असल्याने या सेवेचा वापर वाढला आहे. तसेच या सेवेमुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होत आहे.
कॉरिडॉरनिहाय प्रवासी संख्या
निगडी-दापोडी कॉरिडॉरवर दररोज १ हजार ८०० पेक्षा जास्त बस फेऱ्या होत असून, ९० हजारांपेक्षा जास्त प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात. दिघी-आळंदी कॉरिडॉरवर दररोज १ हजार १०० पेक्षा जास्त बस फेऱ्या होत असून, ६५ हजार ८०० पेक्षा जास्त प्रवासी या मार्गाचा वापर करतात. सांगवी-किवळे कॉरिडॉरवर दररोज १ हजार १०० पेक्षा जास्त बस फेऱ्या होत असून, ५९ हजार ५०० पेक्षा जास्त प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात. काळेवाडी-चिखली कॉरिडॉरवर दररोज १९ हजारांपेक्षा जास्त प्रवासी, तर नाशिक फाटा-वाकड कॉरिडॉरवर दररोज १० हजार ६०० पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात.
बीआरटीएसची कार्यक्षमता
बीआरटीएसची कार्यक्षमता स्पष्ट करताना सह शहर अभियंता बापू गायकवाड यांनी सांगितले की, "बीआरटीएस खूप जागा व्यापते, असे वाटत असले तरी प्रत्यक्षात आकडेवारी वेगळं चित्र दाखवत आहे. निगडी-दापोडी मार्गावर फक्त १५ टक्के रस्त्याच्या जागेचा वापर बीआरटीएस करत असून प्रत्येक तासाला येथे सुमारे ५ हजार ६०० प्रवासी सेवेचा लाभ घेत आहे. तर मिश्र वाहतुकीसाठी असणाऱ्या ५२ टक्के रस्त्यावर केवळ ७ हजार २०० प्रवाशांची वाहतूक होते."
सार्वजनिक वाहतूक क्षमता वाढविण्याच्या योजना
पिंपरी-चिंचवड महापालिकेने सार्वजनिक वाहतूक ताफ्यात वाढ करण्याची प्रक्रिया आधीच सुरू केली आहे. विविध योजना आणि खरेदी मोहिमांद्वारे एकूण २,४०० बस पीएमपीएमएलच्या ताफ्यात समाविष्ट केल्या जात आहेत. यामध्ये पीएमपीएमएलने आधीच खरेदी केलेल्या ४०० नवीन सीएनजी बसांचा समावेश आहे, तसेच पीएमआरडीएकडून ५०० बस आणि पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या सहाय्याने आणखी ५०० बस उपलब्ध होणार आहेत. याव्यतिरिक्त, केंद्र सरकारच्या योजनांतून आणखी १,००० बस मिळण्याची अपेक्षा आहे.
गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या सूचनेनुसार, पुणे आणि पिंपरी चिंचवडसारख्या शहरांनी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरळीत चालण्यासाठी २०३१ पर्यंत ८ हजार १०० बसेस उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यादृष्टिनेही महापालिकेने नियोजन सुरू केले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले की, "पिंपरी चिंचवड शहराचा वाढता विस्तार पाहता बीआरटीएस सेवा ही आपल्या शहरासाठी अत्यावश्यक सेवा आहे. लाखो लोक दररोज या सेवेचा लाभ घेत असून सर्वांना परवडणारी व विश्वासार्ह ही वाहतूक सेवा आहे. आगामी काळात बीआरटीएस कॉरिडॉरचा विस्तार करणे आणि बसेसची संख्या वाढवणे यावर भर देऊन सार्वजनिक वाहतूक बळकट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."
-----------------------------------------------
#BRTS #PimpriChinchwad #PublicTransport #UrbanMobility #SustainableTransport #PCMC #SmartCity #TransportPlanning #BusTransport #PMPMPL
Reviewed by ANN news network
on
५/१६/२०२५ ०४:३७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: