विठ्ठल ममताबादे
उरण, दि. २९ मे – उरण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये माजी तालुकाध्यक्ष मनोजदादा भगत, माजी कार्याध्यक्ष रमण कासकर, प्रवक्ते अजित पाटील, भेंडखळ ग्रामपंचायतीचे सदस्य लिलेश्वर भगत, माजी तालुका सरचिटणीस भूषण ठाकूर, उरण विधानसभा सरचिटणीस निलेश पाटील, ओबीसी सेलचे माजी तालुकाध्यक्ष मच्छिंद्र ठाकूर, तालुका सरचिटणीस नामदेव मढवी, जासई विभाग अध्यक्ष दीपक पाटील, संतोष ठाकूर, गायकवाड आदींचा समावेश आहे.
या सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात घड्याळ चिन्ह असलेले उपरणे परिधान करत अधिकृतपणे पक्षप्रवेश केला. यावेळी विद्यमान तालुकाध्यक्ष परीक्षित प्रकाश ठाकूर, प्रदेश सरचिटणीस गर्जे, आनंद परांजपे, माजी जि.प. सदस्य वैजनाथ ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रवेशामुळे जुने कार्यकर्ते पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात परतल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नवप्रवेशितांचे स्वागत करताना उरण तालुक्यावर अधिक लक्ष देण्याचे आश्वासन दिले. उरणमध्ये मोठ्या प्रमाणावर जमीन संपादन व प्रकल्प झाल्यानंतरही स्थानिकांची अनेक प्रलंबित प्रश्न शिल्लक आहेत, त्यावर उपाययोजना करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
सिडको, जेएनपीटीसारख्या प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांच्या सल्ल्याने धोरणे ठरवण्यात येतील, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. कोणताही दुजाभाव न करता पक्षवाढीच्या कामात सर्व कार्यकर्त्यांना समान संधी दिली जाईल, असा विश्वास त्यांनी दिला.
या पक्षप्रवेशामुळे उरणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अधिक बळकट झाली असून, भविष्यात आणखी कार्यकर्ते या गटात प्रवेश करणार असल्याचे संकेतही देण्यात आले आहेत.
#NCP #AjitPawar #SunilTatkare #UranPolitics #MaharashtraPolitics #PoliticalSwitch #SharadPawarFaction #NCPJoinings

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: