शनिवार, १७ मे, २०२५

३२ लाखांचे कोकेन जप्त, नायजेरियन नागरिकासह दोघांना अटक

 


मुंबई: मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय टोळीतील दोघा सदस्यांना अटक केली आहे. पोलिसांनी ३२ लाख ४० हजार रुपये किंमतीचे ८१ ग्रॅम कोकेन जप्त केले आहे.

खेरवाडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला माहिती मिळाली की जुनैद नईम खान (वय २६) नावाचा एक व्यक्ती एम. आय. जी. क्लब मैदान, बांद्रा पूर्व येथे कोकेन विक्रीसाठी येणार आहे. पोलिसांनी सापळा रचून जुनैदला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत ३ ग्रॅम कोकेन सापडले.

पोलिसांनी जुनैदची चौकशी केली असता, त्याने हे कोकेन ओलनरेवाजू जोवीता इमूओबू (वय ४९, नायजेरियन नागरिक) यांच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले. पोलिसांनी ओलनरेवाजूच्या घरी छापा टाकून ७९ ग्रॅम कोकेन जप्त केले.

पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त सत्यनारायण, अप्पर पोलीस आयुक्त परमजीत सिंह दहिया, पोलीस उप आयुक्त मनीष कलवानिया आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

---------------------------------------------------------------

#MumbaiCrime #DrugBust #CocaineSeized #MumbaiPolice #Arrest

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा