शनिवार, ३१ मे, २०२५

गंभीर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगाराला अटक; ११ गुन्हे उघडकीस

 


मुंबई : गुन्हे शाखा, मुंबई यांनी अभिलेखावरील गंभीर गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेऊन ११ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

आरोपी शिवा आरमोगन शेटटी, जो कांजूरमार्ग पोलीस ठाणे हद्दीत राहत होता, त्याला २२ जानेवारी २०२२ रोजी कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातून जामीन मिळाला होता. या गुन्ह्यात त्याच्यावर भा.दं.वि. कलम ३९९, ४०२, ३०७, ३५३, ३३२, ३२३, ३४ सह विविध गुन्हे दाखल होते, तसेच आर्म्स अॅक्ट आणि मोक्का कायद्यांतर्गतही गुन्हे दाखल होते.

आरोपीवर जबरी चोरी, घरफोडी, खुनाचा प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याने कक्ष-७ कार्यालयाकडून त्याच्या राहत्या पत्त्यावर जाऊन त्याची तपासणी केली जात होती. परंतु तो काही दिवसांपासून घरी मिळून येत नव्हता. त्याने नवी मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात घरफोडी केल्याचे समजले होते.

कक्ष-७ च्या पथकाला माहिती मिळाली की आरोपी कळवा, ठाणे येथे पत्नीसह भाड्याच्या खोलीत राहत आहे. पोलिसांनी तांत्रिक तपास आणि कौशल्याचा वापर करून त्याला कळवा येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने जामिनावर बाहेर आल्यानंतर नवी मुंबई, ठाणे, मिरा भाईंदर आणि पालघर परिसरात घरफोडी व जबरी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी संबंधित पोलीस ठाण्यांशी संपर्क साधून खात्री केली असता, त्यानेच हे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आरोपीला पुढील कारवाईसाठी खारघर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अटक केलेल्या आरोपीचे नाव शिवा आरमोगन शेटटी असून तो कांजूरमार्ग, भांडूप पूर्व येथे राहत होता.

ही कामगिरी पोलीस आयुक्त (बृहन्मुंबई) श्री. देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री. लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१) श्री. विशाल ठाकूर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (डी-पूर्व) श्री. चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

यामध्ये पोलीस निरीक्षक श्री. आत्माजी सावंत, महिला पोलीस निरीक्षक राजश्री बाळगी, स.पो.नि. धनाजी साठे, पो.उप.नि. स्वप्निल काळे, महेश शेलार, नामदेव परबळकर आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- #Mumbai #Crime #Arrest #Theft #Robbery #Maharashtra #Police

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा