मधमाशा पालन, संवर्धनासाठी जनजागृती आवश्यक: डॉ. सावंत यांचे प्रतिपादन



 मधमाशा पालन, संवर्धनासाठी जनजागृती हवी: डॉ. सावंत

'मधमाशांचे महत्त्व' व्याख्यानाला चांगला प्रतिसाद

पुणे: जागतिक मधमाशी दिनानिमित्त 'जीविधा' या संस्थेच्या वतीने 'मानवी जीवनात मधमाशांचे महत्त्व' या विषयावर आयोजित व्याख्यानाला चांगला प्रतिसाद मिळाला. मध, मधमाशा आणि मधमाशी पालन यांचे तज्ज्ञ व संशोधक डॉ. प्रशांत सीता रामचंद्र सावंत यांनी मार्गदर्शन केले.

हे व्याख्यान मंगळवार, २० मे २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, सचिन तेंडुलकर जॉगिंग पार्कसमोर, राजेंद्र नगर, म्हात्रे पुलाजवळ, पुणे येथे झाले. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला होता. पर्यावरण, मधमाशी पालन व नैसर्गिक संवर्धनात रस असलेले नागरिक उपस्थित होते. 'जीविधा'चे संस्थापक राजीव पंडित आणि सौ. वृंदा पंडित यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

डॉ. प्रशांत सीता रामचंद्र सावंत म्हणाले, "मधमाशा नष्ट झाल्या तर मनुष्यजात नष्ट होईल, असे आईनस्टाईन यांनी सांगितले होते. मधमाशांवर मानवी जीवनाचे अस्तित्व अवलंबून आहे. मधमाशी पर-परागीकरण प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे शेती, जंगल, फळझाडात वाढ होते. आग्या (रॉक बी) या मधमाशा फक्त आशियात आढळतात. विकास प्रक्रिया आणि रसायनांमुळे फुलपाखरू आणि मधमाशा कमी होऊ लागल्या आहेत. मधमाशा पालन आणि संवर्धनासाठी जनजागृती केली पाहिजे."

"मानवाने चाखलेला पहिला गोड पदार्थ मध होता. इसवी सन पूर्वी ४ हजार वर्षांपासून मधाचे उल्लेख आढळतात. जगात ४५ हजार पेक्षा अधिक मधमाशा आहेत. परागकणांचा मध आणि फुलांच्या देठातील मकरंद या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. उघड्यावर पोळे बांधणाऱ्या आणि अंधाऱ्या जागेत पोळे बांधणाऱ्या मधमाशा वेगळ्या आहेत. आग्या मधमाशा दुर्गम आणि कडेकपारीत असतात. एक मधमाशी वर्षाला १२ किलोपर्यंत मध गोळा करते. मानवाला डंख मारल्यावर मधमाशी मरते, हे लक्षात घेतले पाहिजे," असेही डॉ. सावंत यांनी सांगितले.

"मधमाशी पालनाने कृषी आणि बागायती पिकांची उत्पादकता वाढू शकते. मध, मेण, परागकण, रोंदण, राजान्न (रॉयल जेली), विष आणि परागीभवन केलेले अन्न असे अनेक पदार्थ मधमाशांकडून मिळतात. ४८ प्रकारचे रोजगार निर्माण करता येतात. ग्रामीण विकासाला चालना देता येते," असे सावंत यांनी स्पष्ट केले.

"पोळे न तोडता, न पिळता मध मिळवणे हे खरे तंत्र आहे. ते शिकले पाहिजे. पेट्यांमध्ये मधमाशी पालन करताना विविध राज्यातील पेट्या बदलणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे," असे मत त्यांनी व्यक्त केले.

000000000000000000000000000000000000

#मधमाशीपालन #Beekeeping #Honeybees #Pune #महाराष्ट्र #Maharashtra #Environment #पर्यावरण #मध #Honey #जीविधा #Jeevidha #DrSawant #WorldBeeDay #जागतिकमधमाशीदिन

मधमाशा पालन, संवर्धनासाठी जनजागृती आवश्यक: डॉ. सावंत यांचे प्रतिपादन मधमाशा पालन, संवर्धनासाठी जनजागृती आवश्यक: डॉ. सावंत यांचे प्रतिपादन Reviewed by ANN news network on ५/२१/२०२५ १०:००:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".