दिघी: एका ६३ वर्षीय सेवानिवृत्त नागरिकाला 'एफएक्स रोड ट्रेडिंग' ॲपच्या माध्यमातून ३९ लाख ८३ हजार ७३० रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी फेसबुक लिंकवरून हे ॲप डाउनलोड केले. त्यानंतर, कंपनीचे व्यवस्थापक रोहन आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून संपर्क साधून गुंतवणुकीसाठी मार्गदर्शन केले.
फिर्यादीला 'एफएक्स रोड ट्रेडिंग' कंपनीत ४३३७१७ क्रमांकाचे ट्रेडिंग अकाउंट उघडण्यास सांगितले गेले आणि वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे जमा करण्यास सांगितले. अकाउंटवर पैसे वाढलेले दिसत असल्याने त्यांनी वेळोवेळी आरोपींनी सांगितल्याप्रमाणे पैसे पाठवले. मात्र, जेव्हा फिर्यादीने अकाउंटमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना यश आले नाही. श्रीमती यशोदा नावाच्या व्यक्तीने त्यांना अधिक पैशांचे आमिष दाखवून पैसे काढू दिले नाही आणि आणखी गुंतवणूक करण्यास भाग पाडले.
अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीने सायबर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या प्रकरणात 'एफएक्स रोड ट्रेडिंग' ॲपचे चालक, 'एफएक्स रोड अकाउंट मॅनेजर' टेलीग्राम ग्रुपचे ॲडमिन, फिर्यादीला फोन करणारे कंपनीचे प्रतिनिधी आणि ज्या बँक खात्यांमध्ये पैसे पाठवले गेले ते खातेधारक यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.
--------------------------------------------------------------------------
#cybercrime #financialfraud #pune #dighi #onlinefraud
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: