पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज (२६ मे २०२५) शहरातील आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आयोजित जनसंवाद सभेत नागरिकांकडून एकूण ७१ तक्रारवजा सूचना प्राप्त झाल्या.
आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार नागरिक आणि प्रशासन यांच्यात थेट संवाद साधण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभेचे आयोजन केले जाते. त्यानुसार आज अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये समन्वय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जनसंवाद सभा पार पडली.
या जनसंवाद सभेत नागरिकांनी पावसाळ्यामुळे उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर आपले म्हणणे मांडले. क्षेत्रीय कार्यालयानुसार प्राप्त तक्रारी व सूचनांची संख्या पुढीलप्रमाणे आहे: अ क्षेत्रीय कार्यालय - ७, ब क्षेत्रीय कार्यालय - १३, क क्षेत्रीय कार्यालय - ७, ड क्षेत्रीय कार्यालय - ९, इ क्षेत्रीय कार्यालय - २, फ क्षेत्रीय कार्यालय - १५, ग क्षेत्रीय कार्यालय - ४ आणि ह क्षेत्रीय कार्यालय - १४.
नागरिकांनी प्रामुख्याने पावसामुळे तुंबलेल्या नाल्यांची साफसफाई करण्याची मागणी केली. तसेच, रस्त्यांवर साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी, विविध ठिकाणी पडलेले खड्डे तातडीने बुजवावेत, उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, पावसाचे पाणी घरात शिरू नये यासाठी रस्त्यांवर योग्य जलनिकासी व्यवस्था करावी, डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, बंद असलेले पथदिवे दुरुस्त करावेत, रस्त्यांवर फिरणाऱ्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा आणि सार्वजनिक वाहतूक थांब्यांवर पावसापासून बचाव होण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा विविध तक्रारी व सूचना नागरिकांनी जनसंवाद सभेत मांडल्या. आता या तक्रारींवर मनपा प्रशासन काय कार्यवाही करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
--------------------------------------------------------------------------------------
#PimpriChinchwad #JanSamvadSabha #PublicGrievances #CivicIssues #MonsoonProblems #PMC #CitizenEngagement #LocalGovernance #Maharashtra #UrbanDevelopment #CommunityFeedback

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: