पिंपरी, दि. २८: पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि चिंचवड फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२५’ येत्या २९ ते ३१ मे दरम्यान शहरात रंगणार आहे. या तीन दिवसीय महोत्सवात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील तब्बल ९० चित्रपट, लघुपट, माहितीपट आणि अॅनिमेशन चित्रपट विनामूल्य दाखवले जाणार आहेत. आकुर्डी येथील ग. दि. माडगुळकर नाट्यगृह आणि चिंचवडमधील छत्रपती संभाजीनगर येथील महात्मा फुले स्पर्धा परीक्षा केंद्र येथे सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत चित्रपट रसिकांसाठी ही पर्वणी असणार आहे.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. यासोबतच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यासह खासदार श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, विधान परिषद सदस्य अमित गोरखे, उमाताई खापरे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, रोहित पवार, माजी आमदार विलास लांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मुंबा फिल्म फाउंडेशन या महोत्सवाचे व्यवस्थापन करत असून पिंपरी येथील रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले महाविद्यालय यासाठी सहकार्य करत आहे. या महोत्सवाचा मुख्य उद्देश केवळ उत्कृष्ट चित्रपट दाखवणे नसून युवा पिढीला प्रेरणा देणे, सामाजिक जाणीव जागृत करणे आणि पिंपरी चिंचवड शहराला जागतिक चित्रपट नकाशावर स्थान मिळवून देणे हा आहे, असे प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.
या महोत्सवात ३९ देशांतील निवडक चित्रपटांचा समावेश असणार आहे. तसेच, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते आणि समीक्षक यांच्याशी संवाद साधण्याची संधीही मिळणार आहे. महोत्सवात मराठी आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांवर आधारित चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. नवोदित चित्रपटकार आणि विद्यार्थ्यांसाठी एक सर्जनशील व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि विविध परदेशी भाषांमधील चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे.
शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
महोत्सवाची प्रमुख वैशिष्ट्ये:
- ३९ देशांतील निवडक चित्रपट
- राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते व समीक्षकांची उपस्थिती
- मराठी व आंतरराष्ट्रीय चित्रपटांवर आधारित चर्चासत्रे
- नवोदित चित्रपटकार व विद्यार्थ्यांसाठी सर्जनशील मंच
- मराठी, हिंदी, इंग्रजी व विविध परदेशी भाषांतील चित्रपट
महोत्सवाचे ठिकाण:
- ग. दि. माडगूळकर सभागृह, सेक्टर २६, प्राधिकरण, निगडी, पिंपरी-चिंचवड, पुणे, महाराष्ट्र ४११०४४
- महात्मा फुले स्पर्धा परीक्षा केंद्र, छत्रपती संभाजी नगर, चिंचवड, पुणे, महाराष्ट्र – ४११०४४
शहरातील चित्रपट रसिकांना पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून देश विदेशातील चित्रपट, लघुपट पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. अशा उपक्रमांच्या माध्यमांतून शहरात चित्रपट संस्कृती रुजण्यास मोठी मदत मिळणार आहे.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी चिंचवडकरांना आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून विविध देशातील चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. चित्रपटांवर आधारित चर्चासत्र देखील या महोत्सवात होणार आहेत. शहरातील नागरिकांसाठी ही एक पर्वणीच आहे.
- विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
==================================================================
- #PimpriChinchwad
- #PCMCFilmFestival
- #InternationalFilmFestival
- #FilmFestival2025
- #MovieBuffs
- #FreeMovies
- #MaharashtraEvents
- #PuneEvents
- #GlobalCinema
- #IndianCinema

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: