फोंडा, गोवा - "राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी शस्त्रांचा वापर करणे अपरिहार्य आहे. साधू-संतांच्या रक्षणासाठी प्रभू श्रीरामांनी अवतार घेतला, तर मुघलांचे आक्रमण वाढल्यानंतर हिंदूंचे रक्षण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु गोविंदसिंग यांचा जन्म झाला. 'सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा'त हिंदूंच्या रक्षणासाठी प्रभू राम पुन्हा अवतरल्याचा अनुभव येत आहे," असे प्रतिपादन 'चाणक्य फोरम'चे मुख्य संपादक आणि निवृत्त मेजर गौरव आर्य यांनी केले.
'सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा'मध्ये 'सनातन राष्ट्र आणि डॉ. जयंत आठवले यांचे विविधांगी कार्य' या सत्रात 'सनातन राष्ट्राची सुरक्षा' या विषयावर ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, पंजाब गोरक्षक दलाचे संस्थापक अध्यक्ष सतीश प्रधान, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक नंदकुमार जाधव आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याचे समन्वयक सुनील घनवट उपस्थित होते.
या सत्रात बोलताना रणजित सावरकर म्हणाले, "हिंदूंचे राजकारण आणि राजकारणाचे सैनिकीकरण होणे गरजेचे आहे. हिंदू बलशाली असले पाहिजेत, पण स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या सरकारांनी याकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे देशाची स्थिती खालावली. अशा परिस्थितीत सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले यांनी हिंदूंच्या एकत्रीकरणाचे कार्य सुरू केले. त्यांच्या गोवा येथील आश्रमात आल्यावर मला त्यांच्या आध्यात्मिक कार्याचा अनुभव आला. डॉ. आठवले हे एकमेव व्यक्तिमत्त्व आहेत, जे देशाला योग्य दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत."
सुनील घनवट यांनी हिंदु जनजागृती समितीने हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी सुरू केलेल्या धर्मशिक्षणवर्गांची माहिती दिली. "आज देशभरात समितीच्या वतीने ५०० हून अधिक धर्मशिक्षणवर्ग यशस्वीरित्या चालवले जात आहेत. समिती समाजाला योग्य मार्गदर्शन करत आहे," असे ते म्हणाले.
नंदकुमार जाधव यांनी डॉ. आठवले यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. " डॉ. आठवले यांनी साधकांना मार्गदर्शन करून जगभर अध्यात्माचा प्रसार केला आहे. नृत्य, गायन आणि संगीत यांसारख्या विविध कलांच्या माध्यमातून आध्यात्मिक प्रगती कशी साधावी, याचेही महत्त्वपूर्ण मार्गदर्शन त्यांनी केले आहे," असे ते म्हणाले.
सतीश प्रधान यांनी महाराष्ट्रात गोमातेला राज्यमातेचा दर्जा मिळाल्याचे नमूद करत गोवा सरकारलाही असे आवाहन केले की, "सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या निमित्ताने हिंदूंच्या श्रद्धेचा विचार करून गोवा सरकारनेही गोमातेला राज्यमातेचा दर्जा द्यावा."
--------------------------------------------------------------------------------------
#Shankhnaad_Mahotsav #Sanatan_Rashtra #Hindu_Religion #National_Security #Goa #Dharma_Education #Gomata

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: