छत्रपती संभाजीनगर: वाळूज येथील उद्योगपती संतोष लड्डा यांच्या बंगल्यावर १५ मे रोजी झालेल्या सुमारे ६ कोटी रुपयांच्या दरोड्यातील फरार संशयित आरोपी अमोल खोतकर पोलिसांशी झालेल्या चकमकीत मारला गेला आहे. ही चकमक वडगाव कोल्हाटी परिसरात झाली.
१५ मे रोजी सहा दरोडेखोरांनी बजाजनगर येथील लड्डा यांच्या बंगल्यात घुसून सुमारे ६ कोटी रुपयांचे सोने, चांदी आणि रोख रक्कम लुटली होती. त्यावेळी लड्डा यांचे कुटुंब अमेरिकेला गेले होते. या दरोड्यातील पाच आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती, मात्र अमोल खोतकर फरार होता आणि चोरी केलेला मुद्देमाल त्याच्याकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, अमोल खोतकर वडगाव कोल्हाटी परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांच्या अंगावर गाडी घातली, ज्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. त्यानंतर संशयित आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला. स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अमोल खोतकर ठार झाला.
दरम्यान, या एन्काऊंटरबाबत पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. यापूर्वी, आमदार संजय शिरसाट यांनी या गुन्ह्यात पोलिसांचा सहभाग असल्याची शंका व्यक्त केली होती. आता अमोल खोतकरच्या एन्काऊंटरमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.
---------------------------------------------------------------------------------------------
#SambhajinagarRobbery #Encounter #PoliceAction #CrimeNews #LaddaRobbery #AurangabadCrime #MaharashtraPolice #RobberyCase
Reviewed by ANN news network
on
५/२७/२०२५ ०५:४३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: