पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्यात आळंदीजवळ कत्तलखाना उभारण्याचा घाट!; सीमा सावळे यांचा विरोध
आळंदीजवळ कत्तलखान्याचा घाट; वारकरी संप्रदायात तीव्र असंतोष
माजी स्थायी समिती सभापती सिमा सावळे यांचा प्रशासनाला कठोर विरोध
पिंपरी-चिंचवड, दि. २९ (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने जाहीर केलेला सुधारित विकास आराखडा (डीपी प्लॅन) एका नव्या वादात सापडला आहे. मोशी-डुडुळगावच्या हद्दीत, पवित्र आळंदी शहरापासून अगदी जवळ असलेल्या इंद्रायणी नदीच्या काठी तब्बल ४ एकर जागेवर कत्तलखाना प्रस्तावित करण्यात आल्याने वारकरी संप्रदाय आणि हिंदुत्ववादी संघटनांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पवित्र भूमीवर अशा प्रकारचा प्रस्ताव आणल्याने धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहे.
माजी स्थायी समिती सभापती आणि माजी नगरसेविका सिमा सावळे यांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध केला आहे. त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध नोंदवत म्हटले आहे की, "इंद्रायणी नदी आणि आळंदीसारख्या पावन स्थळाजवळ कत्तलखाना उभारण्याचा प्रशासनाचा विचार हा समस्त हिंदू समाज आणि वारकरी बांधवांच्या भावनांचा अपमान आहे. हा निर्णय धार्मिक परंपरा आणि स्थानिक संस्कृतीचा घोर अनादर आहे."
प्रशासनाने मोशी येथील सर्वेक्षण क्रमांक ३२५ मध्ये हा कत्तलखाना प्रस्तावित केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे याच भूखंडाजवळ देहू-आळंदी मार्गावर महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानच्या वेदश्री तपोवनच्या अगदी बाजूला आरक्षण क्रमांक ५/२२० अंतर्गत कत्तलखाना प्रस्तावित आहे. याशिवाय, कत्तलखान्याच्या शेजारीच सुमारे ४ एकर जागेवर जनावरांचा दवाखाना (आरक्षण क्रमांक ५/२२१) प्रस्तावित करण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना सिमा सावळे म्हणाल्या, "जनावरांचा दवाखाना आणि कत्तलखाना एकाच ठिकाणी प्रस्तावित करणे हा निव्वळ मूर्खपणा आहे. हे नियोजन पूर्णपणे अवैज्ञानिक आणि अनैतिक आहे. प्रशासनाला दूरदृष्टीचा अभाव आहे, हे यातून स्पष्टपणे दिसून येते. हा प्रस्ताव प्रशासनाची नियोजनशून्यता आणि असंवेदनशीलता दर्शवतो."
पवित्र नद्या, धार्मिक स्थळे आणि नागरिकांच्या भावनांचा कोणताही विचार न करता अशा प्रकारचा प्रस्ताव आणल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. वारकरी आणि हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल प्रशासनाने त्वरित जाहीर माफी मागावी, अशी मागणी सिमा सावळे यांनी केली आहे. तसेच, हा प्रस्तावित सुधारित विकास आराखडा तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली असून, अन्यथा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या पवित्र भूमीचे पावित्र्य जपण्यासाठी आणि नागरिकांच्या भावनांचा आदर राखण्यासाठी प्रशासनाने तातडीने योग्य पाऊल उचलावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
Pimpri Chinchwad Municipal Corporation, Draft Revised Development Plan, Alandi, Slaughterhouse Proposal, Indrayani River, Hindu Organizations, Warkari Sect, Seema Savale, Protest, Religious Sentiments.
#Alandi #Slaughterhouse #PCMC #IndrayaniRiver #HinduProtest #WarkariSampraday #SeemaSavale #DevelopmentPlan #ReligiousSentiments #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: