सोमवार, १९ मे, २०२५

रायगड आणि नवी मुंबईत ड्रोन कॅमेऱ्यांवर बंदी



उरण/नवी मुंबई: कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून रायगड जिल्ह्यात आणि संपूर्ण नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन कॅमेऱ्यांच्या वापराला बंदी घालण्यात आली आहे. सागरी किनाऱ्यांवर नेहमीच ड्रोन बंदीचे आदेश असतात, परंतु पहलगाम येथील हल्ल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव ही बंदी संपूर्ण जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताने दिलेल्या प्रत्युत्तरामुळे दोन्ही देशांदरम्यान शस्त्रसंधी असली तरी, सुरक्षेच्या दृष्टीने अधिक सतर्कता बाळगली जात आहे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ड्रोनचा वापर हल्ल्यांसाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर ठाणे पाठोपाठ रायगड आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन कॅमेऱ्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्राला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ऐरोली ते घारापुरी लेणीपर्यंत सुमारे ११० किलोमीटरचा सागरी किनारा येतो. या भागात एरव्ही देखील ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर प्रतिबंधित असतो. मात्र, पहलगाम येथील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता संपूर्ण पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन बंदी लागू करण्यात आली आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ नुसार हे आदेश जारी केले आहेत. नवी मुंबईच्या हद्दीत काही असामाजिक तत्त्वांकडून ड्रोन किंवा इतर मानवरहित हवाई उपकरणांचा वापर होण्याची शक्यता आहे. यामुळे राष्ट्रीय सुरक्षा तसेच सार्वजनिक शांततेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या उपकरणांचा अनियंत्रित वापर टाळण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. हे आदेश १५ मे २०२५ पासून ते ३ जून २०२५ पर्यंत लागू राहतील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता कलम २२३ आणि इतर लागू कायद्यांनुसार कारवाई करण्यात येईल, असे नवी मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

"काही अनपेक्षित घटना घडू नये म्हणून ड्रोनवर बंदी घालण्यात आली आहे. खासगी समारंभांमध्ये हौस म्हणून ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केला जातो, परंतु त्यामुळे भीती आणि अफवा पसरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ही बंदी घालण्यात येत आहे. कोणीही या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल," असे सहाय्यक पोलीस आयुक्त, विशेष शाखा, इंद्रजित करले यांनी सांगितले.
--------------------------------------------------

 #DroneBan #Raigad #NaviMumbai #Security #MaharashtraPolice #PahalgamAttack

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा