महामार्गावरील अपघात सातत्य कायम
खेड, दि. १९ मे २०२५ :
मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील भरणे नाका येथे आज पहाटे साडेपाच वाजता
भीषण अपघात घडला. जगबुडी नदीच्या पुलावरून धावत्या किया कंपनीच्या कारने सुरक्षा
कठड्याला धडक दिल्यानंतर सुमारे दीडशे फूट खोल नदीपात्रात कोसळून ५ प्रवाशांचा जागीच
मृत्यू झाला, तर २ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच
स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बचावपथकाने तातडीने मदतकार्य
सुरू करून गाडीत अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढले. मृतांमध्ये एकच कुटुंबातील
सदस्यांचा समावेश असून हे सर्वजण अंत्यविधीसाठी मुंबईहून देवरुख येथे जात होते.
अपघातातून सुखरूप
बचावलेले विवेक श्रीराम मोरे (मीरा रोड) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे
सासरे देवरुख येथे शनिवारी मयत झाले होते आणि त्यांच्या अंत्यविधीसाठी हे सर्वजण
प्रवास करत असताना ही दुर्घटना घडली.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये मिताली विवेक
मोरे, मिहिर विवेक मोरे, परमेश पराडकर, मेघा परमेश पराडकर आणि सौरभ परमेश पराडकर
अशी मृतांची नावे आहेत. तर विवेक
श्रीराम मोरे आणि श्रेयस राजेंद्र सावंत यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात
दाखल करण्यात आले आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी
कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. स्थानिकांनी दिलेल्या
माहितीनुसार, याच जगबुडी नदीच्या पुलाजवळ आतापर्यंत १५ ते २० अपघात झाले आहेत.
महामार्गाचे सुरक्षा कठडे वारंवार अपघात आणि तुटफूट झाल्यामुळे ही गाडी थेट
नदीपात्रात कोसळली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. वारंवार होणारे अपघात आणि सुरक्षा मानकांकडे दुर्लक्ष यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
-----------------------------------------------------------------------------------
#MumbaiGoaHighway #RoadSafety #KhedAccident #JagbudiRiver #TrafficSafety #RoadAccident #Ratnagiri #HighwayAccident #CarAccident #MaharashtraNews
Reviewed by ANN news network
on
५/१९/२०२५ ११:०४:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: