पुणे, दि. २० मे २०२५: शारीरिक, मानसिक, बौद्धिक, ऊर्जात्मक आणि आध्यात्मिक अशा मुलांच्या पंचकोशीय विकासासाठी वाचन आणि खेळ अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे मत लोकप्रिय अभिनेते प्रवीण तरडे यांनी व्यक्त केले आहे.
राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे महानगरपालिका, पुणे पुस्तक महोत्सव आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २२ ते २५ मे दरम्यान स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा केंद्रात ‘पुणे बाल पुस्तक जत्रा’ आयोजित करण्यात आली आहे. या जत्रेअंतर्गत ‘आपलं अंगण’ या विशेष उपक्रमाची झलक आज संभाजी उद्यानात पुणेकरांना अनुभवायला मिळाली. यावेळी अभिनेता प्रवीण तरडे उपस्थितांना संबोधित करत होते.
या कार्यक्रमात अभिनेत्री तेजस्विनी लोणारी, सुनील महाजन, अर्चना सोनवणे, सरोज पांडे, राजश्री जायभाय, प्रसाद मिराजदार, अनिल बेलकर आणि विजयेंद्र चाबुकस्वार यांसारख्या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या सर्वांनी लहान मुलांसोबत पारंपरिक खेळ खेळण्याचा मनसोक्त आनंद घेतला.
प्रवीण तरडे म्हणाले, "आजकाल लहान मुलांमध्ये मोबाईलच्या वापराचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे त्यांचा स्क्रीन टाईम वाढला असून एकाग्रता कमी झाली आहे. याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या अभ्यास आणि व्यक्तिमत्व विकासावर होत आहे. त्यामुळे पालकांनी वेळीच लक्ष देऊन मुलांना सकस वाचनाची आणि भरपूर खेळ खेळण्याची सवय लावणे गरजेचे आहे."
अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या, "विटी दांडू, चाक फिरवणे, दोरीवरच्या उड्या, गोट्या, भोवरा आणि भातुकली यांसारखे पारंपरिक खेळ खेळत आमचे बालपण समृद्ध झाले. या खेळांमुळे एकाग्रता, स्मरणशक्ती, निरीक्षण शक्ती आणि शारीरिक लवचिकता यांसारख्या क्षमतांचा विकास झाला. पुणे बाल वाचन जत्रेत मागील पिढीतील पालकांना आणि त्यांच्या मुलांना हे खेळ पुन्हा अनुभवण्याची संधी मिळणार आहे. मी सर्वांना आवाहन करते की, या खेळांचा अनुभव घ्या आणि समृद्ध व्हा."
-----------------------------------------------------------------------------------------
#PravinTarde #PuneBalPustakJatra #ChildDevelopment #ReadingIsImportant #PlayIsImportant #TraditionalGames #PuneEvents #ChildrensFestival

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: