भिवंडी, ठाणे ग्रामीण: भिवंडी तालुका पोलिसांनी खारगोडा जुनादुर्खी हद्दीतील जंगलात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी २४ तासांच्या आत आरोपीला अटक केली आहे. या गुन्ह्यात कोणताही पुरावा नसतानाही पोलिसांनी आरोपीला शोधून काढण्यात यश मिळवले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ मे २०२५ रोजी सकाळी ११:०० ते १२:०० च्या दरम्यान खारगोडा जुनादुर्खी येथे एका अनोळखी व्यक्तीने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध स्थापित केले. आरोपीने पीडितेसोबत असलेल्या तिच्या मैत्रिणींनाही धमकावून तिथून हाकलून दिले आणि पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी आणि अप्पर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांनी आरोपीला तातडीने अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार उप विभागीय पोलीस अधिकारी राहुल झाल्टे, सुरेश मनोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण आणि पोलीस निरीक्षक विलास कदम यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करण्यात आली.
तपासादरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक शिवकुमार जाधव, महिला सहायक पोलीस निरीक्षक दिपाली लांभाते, पोलीस उपनिरीक्षक महेश कदम आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे खारगोडा जुनादुर्खीच्या जंगलात शोध मोहीम सुरू केली. या शोध मोहिमेदरम्यान, फिर्यादीने दिलेल्या वर्णनाशी जुळणारा एक संशयीत व्यक्ती पोलिसांना आढळला. चौकशीत त्याने आपले नाव शिवम अशोक वळवी (वय २० वर्षे, रा. संदीप राऊत यांच्या विटभट्टीजवळ, जुनादुर्खी) असल्याचे सांगितले. अधिक चौकशी केल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला.
आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील कारवाईसाठी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक भारत तांगडे, उप विभागीय पोलीस अधिकारी राहुल झाल्टे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कदम, सहायक पोलीस निरीक्षक शिवकुमार जाधव, महिला सहायक पोलीस निरीक्षक दिपाली लांभात, पोलीस हवालदार उमेश पांडुरंग ठाकरे, पोलीस हवालदार हनुमान बंधू गायकर, पोलीस हवालदार सुहास गंगाधर सोनवणे आणि पोलीस शिपाई जयेश गुरुनाथ मुकादम यांच्या पथकाने ही कामगिरी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक दिपाली लांभाते, भिवंडी तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
------------------------------------------------
#Maharashtra #Thane #RapeCase #Arrested #PoliceAction

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा