बृहन्मुंबईत फटाके आणि रॉकेट फोडण्यास मनाई
मुंबई, दि. १९ मे २०२५: बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आता कोणत्याही व्यक्तीस फटाके आणि रॉकेट फोडण्यास मनाई करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारी, बृहन्मुंबई, अकबर पठाण यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. हा आदेश २० मे २०२५ च्या ००.०१ वाजेपासून ते १८ जून २०२५ च्या २४.०० वाजेपर्यंत लागू राहणार आहे. यापूर्वीचा ०९ मे २०२५ रोजीचा संबंधित आदेश रद्द करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही असामाजिक तत्व बृहन्मुंबईच्या हद्दीत फटाके किंवा रॉकेट फेकण्याचा प्रयत्न करू शकतात. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या ठिकाणांना धोका निर्माण होऊ शकतो, तसेच सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता आहे. याच कारणास्तव, फटाके आणि रॉकेटच्या अनियंत्रित वापराला प्रतिबंध घालणे आवश्यक असल्याने तातडीने ही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे, असे पोलीस उपायुक्तांनी सांगितले.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम (XXII) १९५१ च्या कलम १३१ (V) तसेच इतर लागू असलेल्या कायद्यांनुसार कारवाई केली जाईल. तातडीच्या परिस्थितीमुळे हा आदेश 'एक्स-पार्टे' पद्धतीने लागू करण्यात आला आहे.
हा आदेश पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या कार्यालयातून जारी करण्यात आला आहे.
----------------------------------------------------------------------------------------
#MumbaiPolice #FirecrackerBan #PublicSafety #LawAndOrder #AkbarPathan #MumbaiNews #MaharashtraPolice
Reviewed by ANN news network
on
५/२१/२०२५ ०३:३०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: