भाजपा महिला मोर्चाची राज्यभर 'सिंदूर यात्रा', जवानांना आदरांजली

 


मुंबई: भारतीय जनता पार्टी (भाजपा) महिला मोर्चातर्फे राज्यभर सैन्य दलाच्या जवानांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी 'सिंदूर यात्रा' आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी शनिवारी दिली. पहलगाम येथे २६ निरपराध भारतीयांच्या हल्ल्याला ऑपरेशन सिंदूरद्वारे मोदी सरकारने चोख उत्तर दिले. पहलगाम हल्ल्यात ज्या महिलांचे कुंकू पुसले गेले, त्यांच्या अश्रूंचा भारतीय सैन्याने बदला घेतला, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार वाघ बोलत होत्या. प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष वर्षा भोसले आदी यावेळी उपस्थित होते. आपण २१ मे रोजी नांदेड येथे काढण्यात येणाऱ्या सिंदूर यात्रेत सहभागी होणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

दहशतवाद्यांच्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी केलेल्या कारवाईत मिळालेले यश भारतीय स्त्री शक्तीला समर्पित केल्याबद्दल आणि या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असे नाव दिल्याबद्दल आमदार वाघ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला जबरदस्त उत्तर देत भारतीय लष्कराने नवभारताची प्रचिती आणून दिली आहे, असे त्या म्हणाल्या. या मोहिमेत भारतीय सैन्याने अतुलनीय शौर्य दाखविले. सैन्य दलाच्या पराक्रमाला अभिवादन करण्यासाठी भाजपा महिला मोर्चातर्फे देशभर सिंदूर यात्रांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातही अशा यात्रांचे आयोजन करण्यात येणार असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ही सिंदूर यात्रा निघणार आहे, असे त्यांनी नमूद केले.

भारतीय लष्कराच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी देशभर तिरंगा यात्रा काढल्या जात आहेत आणि या यात्रांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या यात्रांमध्ये सर्व थरातील नागरिक पक्षभेद बाजूला ठेवून सहभागी होत आहेत. सिंदूर यात्रांमध्येही महिलांनी याच पद्धतीने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार वाघ यांनी केले आहे.

खासदार संजय राऊत यांनी आपल्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकात पत्रा चाळीच्या प्रकरणात फसविल्या गेलेल्या सामान्य नागरिकांचे मनोगतही समाविष्ट करावे, असा टोला चित्रा वाघ यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात लगावला. खासदार राऊत हे दररोज सकाळी जी भाषा वापरतात ते पाहता त्यांचे नाव 'गटारातला अर्क' असे हवे, असेही त्या म्हणाल्या. पत्रा चाळीच्या भाडेकरूंची घरे घेऊन त्यांना फसवले गेले, अनेक महिलांनी आपली मंगळसूत्रे गहाण ठेवून घर घेण्यासाठी पैसे उभे केले होते. या महिलांचा आक्रोश महाराष्ट्राने पाहिला आहे. त्याबद्दलही या पुस्तकात एखादे दुसरे प्रकरण हवे, असे आमदार वाघ म्हणाल्या.

--------------------------------------------------------------

#सिंदूरयात्रा #BJP #ChitraWagh #MaharashtraPolitics #IndianArmy #SanjayRaut

भाजपा महिला मोर्चाची राज्यभर 'सिंदूर यात्रा', जवानांना आदरांजली भाजपा महिला मोर्चाची राज्यभर 'सिंदूर यात्रा', जवानांना आदरांजली Reviewed by ANN news network on ५/१७/२०२५ ०४:४७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".