"मतदान जागृतीसाठी चिंचवड मूक-बधिर विद्यालयाचा अनोखा उपक्रम"
चिंचवड : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंचवड मूक-बधिर विद्यालयात आयोजित पालक मेळाव्यात शेकडो पालकांनी शंभर टक्के मतदानाचा संकल्प केला. २० नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या निर्देशानुसार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उमा तारु यांनी सांगितले की, संस्थेत १६९ दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. २०५ चिंचवड आणि २०६ पिंपरी (अ.जा.) विधानसभा क्षेत्रांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात पालकांनी मतदानाची शपथ घेतली.
स्वीप नोडल अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी शपथेचे वाचन केले, तर दुभाषिक स्मिता घबाडे व अर्जुन मोरे यांनी सांकेतिक भाषेत शपथेचे अनुवादन केले. शपथेत धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या प्रभावाखाली न येता आणि कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करण्याचे आश्वासन देण्यात आले.
सुहृद मंडळ पुणे संचालित या आय.एस.ओ. मान्यताप्राप्त शासकीय अनुदानित विद्यालयातून आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. माजी विद्यार्थ्यांच्या पालकांनाही मतदानाचे आवाहन करण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापिका तारु यांनी सांगितले.
कार्यक्रमास नोडल अधिकारी श्रीनिवास दांगट, शरद पाटील, राजीव घुले, उप प्राचार्या पल्लवी पिंपळे यांच्यासह स्वीप व्यवस्थापनाचे अधिकारी आणि शेकडो पालक उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
११/१३/२०२४ ०५:१३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: