"निवडणूक आचारसंहितेत अवैध मद्य व्यवहारांवर कारवाई; ५१ जणांना अटक"
रत्नागिरी (प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत सुमारे १ कोटी १९ लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत ६६ गुन्हे नोंदवून ५१ जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती विभागाचे अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी दिली.
१५ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या आचारसंहितेच्या काळात विभागाने विशेष मोहीम राबवली. यात १,४०० लिटर हातभट्टीची गावठी दारू, ४५.९ बल्क लिटर देशी मद्य, ५६.७ बल्क लिटर विदेशी मद्य आणि गोव्यातून आणलेले ९,२७४.६३ बल्क लिटर विदेशी मद्य जप्त करण्यात आले. याशिवाय २७,२०५ लिटर रसायन तसेच मद्य वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे आयशर टेम्पो व मारुती स्विफ्ट कारही जप्त करण्यात आल्या.
विभागाने चार विशेष पथके स्थापन केली असून, मुंबई-गोवा, कोल्हापूर-रत्नागिरी आणि चिपळूण-कराड या मार्गांवर विशेष नाकेबंदी करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाच्या मदतीने रेल्वे मार्गावरही तपासणी सुरू आहे.
जानेवारीपासून आतापर्यंत महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या कलम ९३ अंतर्गत २८ प्रकरणांत १६ लाख रुपयांची चांगल्या वर्तणुकीची बंधपत्रे घेण्यात आली आहेत.
अवैध मद्य व्यवहाराची माहिती देण्यासाठी नागरिकांनी व्हॉट्सअॅप क्रमांक ८४२२००११३३ किंवा टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ वर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक शेडगे यांनी केले आहे. माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: