कलाकारांच्या सुरेल गायनाने रंगला दिवाळी पहाट सोहळा
वशेणी (उरण) (प्रतिनिधी) -उरण तालुक्यातील वशेणी गावात वशेणी इतिहास संपादकीय मंडळाच्या वतीने 'दिवाळी पहाट २०२४' या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. गावात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी रायगडभूषण प्रा. एल. बी. पाटील, मधुबन कट्टा अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे, वशेणी गावच्या सरपंच अनामिका म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उरण, पेण, पनवेल आणि ठाणे परिसरातील विविध कलाकारांनी दीपावली आणि भारतीय संस्कृतीशी निगडित सुरेल गीते सादर केली. गौरी कोरगावकर, कुमारी हर्षाली म्हात्रे, सानिका पाटील यांच्यासह अनेक कलाकारांनी आपल्या सादरीकरणातून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने छोट्या पडद्यावरील उदयोन्मुख अभिनेत्री प्रज्ञा प्रमोद म्हात्रे हिचा विशेष सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे कार्यकारिणी सदस्य एल. बी. पाटील यांनी कार्यक्रमाचे कौतुक करताना सादर केलेल्या गीतांनी आणि निवेदनाने गावपण जागे झाल्याचे मत व्यक्त केले.
मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी सूत्रसंचालन केलेल्या या कार्यक्रमास माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: