एक देश, एक संविधान धोक्यात - मोदींचा इंडी आघाडीवर जोरदार हल्लाबोल
अकोला (वृत्तसंस्था) - जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्याचे काँग्रेस आघाडीचे कारस्थान उघड करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. अकोला येथे महायुतीच्या प्रचारसभेत बोलताना ते म्हणाले की, काँग्रेस व मित्रपक्षांची भाषा पाकिस्तान आणि विभाजनवादी शक्तींसारखीच आहे.
"काश्मीरमध्ये काँग्रेस आघाडीला सत्ता मिळताच तेथे कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडण्यात आला. हा डाव बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानास पुन्हा तेथून हद्दपार करण्याचा आहे," असा गंभीर आरोप पंतप्रधानांनी केला.
महाराष्ट्राच्या विकासाचा आढावा घेताना त्यांनी वाढवण बंदराचा ८० हजार कोटींचा प्रकल्प, गरीबांसाठी पक्की घरे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य सेवा यासारख्या महत्त्वाच्या योजनांचा उल्लेख केला.
महाआघाडीवर टीका करताना मोदी म्हणाले, "जेथे काँग्रेस मित्रपक्षांची सरकारे बनतात, ते सारे काँग्रेसच्या शाही परिवाराचे एटीएम म्हणून काम करतात." कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशचे उदाहरण देत त्यांनी महाआघाडीच्या भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधले.
काँग्रेसवर जातीय संघर्ष माजवण्याचा आरोप करताना पंतप्रधान म्हणाले की, "देश कमजोर झाला तर काँग्रेस मजबूत होईल, आणि काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूर होईल." बाबासाहेब आंबेडकरांच्या पंचतीर्थांकडे काँग्रेसच्या शाही परिवाराने केलेल्या दुर्लक्षाचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी काँग्रेसला जाब विचारला.
सभेला केंद्रीय मंत्री रामदास आठवले, प्रतापराव जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ आणि महायुतीचे उमेदवार उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
११/०९/२०२४ ०५:३९:०० PM
Rating:



कोणत्याही टिप्पण्या नाहीत: