मीडिया प्रतिनिधींना मतमोजणी केंद्रात निर्बंधित स्वरूपात प्रवेश
मुंबई : भारत निवडणूक आयोगाने मतमोजणी वृत्तांकनासाठी पत्रकारांना महत्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांमध्ये मतमोजणी केंद्रातील वृत्तांकन प्रक्रियेबाबत कठोर निर्देश देण्यात आले आहेत.
निवडणूक आयोगाच्या स्पष्ट सूचनांनुसार, पत्रकारांना मतमोजणी केंद्रात प्रवेश करण्यासाठी प्राधिकारपत्र व ओळखपत्र बंधनकारक असणार आहे. माध्यम प्रतिनिधींना केवळ माध्यम कक्षातून मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट किंवा आयपॅडचा वापर करता येणार आहे.
छायाचित्रकारांसाठी विशेष निर्बंध लागू करण्यात आले असून, केवळ हँड हेल्ड कॅमेऱ्याद्वारेच शूटींग करता येईल. एकाच वेळी पाच पत्रकारांना सिमांकित रेषेपर्यंत प्रवेश देण्यात येईल. त्यांना फक्त ३०-३५ सेकंदांचे शूटींग करण्याची परवानगी असणार आहे.
महत्वाचे म्हणजे, ईव्हीएम मशीनवरील अंक दिसणार नाहीत याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पत्रकारांनी मोबाईल/इलेक्ट्रॉनिक उपकरणे माध्यम कक्षातील सहकाऱ्याकडे ठेवावीत.
मतमोजणी परिसरात ओळखपत्रधारक पत्रकारांना त्यांच्या ओळखपत्राच्या आधारे प्रवेश व बाहेर जाण्याची परवानगी असेल. निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: