लाडकी बहीण योजनेचा प्रभाव; एक है तो सेफ है नाऱ्याला प्रतिसाद
मुंबई (प्रतिनिधी) - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच महायुतीने आघाडी घेतली असून, १६ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. दुपारपर्यंतच्या कलानुसार महायुतीला २०९ जागांवर आघाडी मिळाली आहे.
आकडेवारीनुसार, महायुतीने जिंकलेल्या १६ जागांपैकी ७ जागा भाजपने ५ जागा शिंदे सेनेने आणि ४ जागाराष्ट्रवादी अजित पवार गटाने जिंकल्या आहेत. आघाडीवर असलेल्या एकूण २०९ जागांमध्ये भाजपच्या १२३, शिंदेसेनेच्या ५० आणि अजितपवार गटाच्या ३६ जागांचा समावेश आहे.
शहादा- राजेश पाडवी, अकोला- रणधीर सावरकर, घाटकोपर पूर्व- पराग शाह, वडाळा- कालिदास कोळंबकर, पुणे कॆम्प- सुनील कांबळे, शिर्डी- राधाकृष्ण विखे पाटील, सातारा- शिवेंद्रराजे भोसले, कणकवली- नितेश राणे, शिराळा- सत्यजित देशमुख हे भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.
शिंदेसेनेचे पालघर- राजेंद्र गावित, बोईसर- विलास तरे, भिवंडी ग्रामीण- शांताराम मोरे, महाड- भरत गोगावले, नेवासा विठ्ठल लांघे, सावंतवाडी- दीपक केसरकर हे उमेदवार विजयी झाले आहेत.
अजित पवार गटाचे अमळनेर- अनिल पाटील, निफ़ाड- दिलीपराव बनकर, दिंडोरी- नरहरी झिरवळ, श्रीवर्धन- अदिती तटकरे, कोपरगाव- आशुतोष काळे, उद्गिर- संजय बनसोडे हे विजयी झाले आहेत.
तर, महाविकास आघाडीला अद्यापपर्यंत १ जागा जिंकता आली आहे. माढा येथून शरद पवार गटाचे अभिजित पाटील विजयी झाले आहेत. महायुती ५० जागांवर आघाडीवर आहे. उद्धवसेनेचे उमेदवार २० जागांवर, कॊंग्रेस आयचे उमेदवार १९ जागांवर आणि शरद पवार गटाचे उमेदवार ११ जागांवर आघाडीवर आहेत.
राजकीय निरीक्षकांच्या मते, महायुती सरकारच्या 'लाडकी बहीण' योजनेसह विविध कल्याणकारी योजनांचा हा निकाल आहे. "एक है तो सेफ है" या नाऱ्याने मतदारांवर प्रभाव टाकल्याचेही दिसून येत आहे.
"जनतेने विकासाला प्राधान्य दिले आहे. महायुतीच्या विजयानंतर राज्याचा विकास अधिक वेगाने होईल," असे मत भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले. त्यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंतत्री व्हावेत अशी इच्छाही माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.
२०१९ च्या निवडणुकीत महायुतीला जनतेने कौल दिला होता, मात्र मुख्यमंत्रिपदाच्या वाटपावरून युती तुटली होती. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले, जे २०२२ मध्ये कोसळले. या पार्श्वभूमीवर २०२४ च्या निवडणुकीत महायुतीने पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे.
नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड शहरात पिंपरी मतदारसंघातून अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे ३६६९८ मतांनी तर भाजपचे शंकर जगताप १ लाख ३ हजार इतक्या प्रचंड मताधिक्याने विजयी झाले आहेत. भोसरी मतदारसंघात भाजपचे महेश लांडगे त्यांचे प्रतिस्पर्धी शरद पवार गटाचे अजित गव्हाणे यांच्यापेक्षा पुढे होते. बारामतीतून अजित पवारही विजयी झाले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात दापोली मतदार संघात शिंदेसेनेचे योगेश कदम, गुहागरमधून उद्धवसेनेचे भास्कर जाधव, चिपळूण अजित पवार गटाचे शेखर निकम, रत्नागिरीमधून शिंदेसेनेचे उदय सामंत आणि राजापूरमधून किरण सामंत हे विजयी झाले आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: