पुणे : नागरिकांचे आर्थिक व्यवहार हे बहुतांशी ऑनलाइन पद्धतीने होत असल्यामुळे चोरट्यांनी आता ऑनलाइन गुन्हेगारीकडे लक्ष केंद्रित केले आहे. परिणामी, शहरात दररोज सुमारे ७० ते ८० सायबर गुन्ह्यांचे तक्रार अर्ज दाखल होत आहेत. गंभीर गुन्ह्यांच्या तुलनेत सायबर गुन्ह्यांची संख्या दुपटीने वाढत असल्यामुळे सध्याच्या एकमेव सायबर पोलिस ठाण्यावर मोठा ताण पडत आहे. यामुळे सायबर गुन्ह्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पर्वती विधानसभा मतदारसंघात नवीन सायबर पोलिस स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पर्वती विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवार आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली.
प्रचार फेरीत सायबर सुरक्षा आणि गुन्ह्यांचा मुद्दा अग्रभागी
माधुरी मिसाळ यांच्या प्रचारासाठी सॅलिस्बरी पार्क परिसरात प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, कविता वैरागे, राजश्री शिळीमकर, प्रवीण चोरबोले, डॉ. भरत वैरागे, बंटी मोकळ, देवेंद्र बनसोडे, सुनील इंगळे, प्रसन्न वैरागे, निखिल शिळीमकर, उमेश शहा, सिद्धार्थ चिंचोळकर, किरण रामसिन्हा, राजेंद्र सरदेशपांडे, गणपत मेहता, पूजा जोशी, संगीता कांबळे, वंदना गावडे, रेणुका पाठक, अनिल भन्साळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
गुन्हेगारांच्या नवीन क्लुप्त्या - पोलिसांसमोर आव्हान
मिसाळ म्हणाल्या की, वाढत्या तंत्रज्ञानामुळे गुन्हेगारांच्या नवीन युक्त्या पोलिसांना डोकेदुखी ठरत आहेत. सध्या गंभीर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी ३० पोलिस ठाणी आणि संपूर्ण गुन्हे शाखा कार्यरत आहे. मात्र, सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे एकमेव सायबर पोलिस ठाण्यावर मोठा ताण पडत आहे. यामुळे प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असून, पर्वतीत सायबर पोलिस ठाणे उभारून प्रशिक्षित पोलिसांची नेमणूक केली जाणार आहे.
पुण्यातील पोलिस स्टेशनांची वाढती संख्या
पुण्याच्या वाढत्या गुन्हेगारी आणि वाढत्या शहरी हद्दीमुळे महायुती सरकारने आंबेगाव, नांदेड सिटी, बाणेर, खराडी, काळे, फुरसुंगी, काळेपडळ अशा ठिकाणी नवीन पोलिस स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सध्याच्या पोलिस ठाण्यांवरील ताण कमी होणार आहे. पर्वती मतदारसंघात सिंहगड रस्ता आणि बिबवेवाडी परिसरात प्रत्येकी एक पोलिस स्टेशन आणि पोलिस चौकी उभारण्यात आली. या ठिकाणी आवश्यक मनुष्यबळ पुरवले गेले असून, प्रशासन अधिक गतिमान होण्यासाठी संगणक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे गुन्ह्यांचा तपास तत्काळ आणि प्रभावी पद्धतीने होऊ लागला आहे.
मतदारसंघातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात यश
मिसाळ म्हणाल्या, "गुन्ह्यांचा तपास तत्काळ आणि कुशलतेने होण्यासाठी पोलिस ठाण्यांच्या तपास पथकांना पुरेसे साधनसंपन्न बनविण्यात आले आहे. परिणामी, मतदारसंघातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात मोठे यश मिळाले आहे."
पर्वतीत सायबर पोलिस स्टेशन उभारण्याच्या निर्णयामुळे भविष्यात सायबर गुन्हेगारीवर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळवता येईल आणि नागरिकांना सुरक्षित ऑनलाइन व्यवहार करता येईल, अशी अपेक्षा आहे.
Reviewed by ANN news network
on
११/१५/२०२४ ०८:४०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: