भोसरी : "परिवर्तन हे नागरिकांनी ठरवलेले आहे. येथे लोकप्रतिनिधी नसून एक प्रकारची ताबा गँग कार्यरत आहे. येथे टक्केवारीच्या खेळात फक्त स्वतःच्या जवळच्या लोकांना ठेके देऊन त्यातून पैसे कमवायचे काम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी येथे परिवर्तनाचा निश्चय केला आहे. एकाधिकारशाहीला मुळापासून संपवायचे आहे," असे मत आमदार रोहित पवार यांनी भोसरी येथे व्यक्त केले.
महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ रोहित पवार भोसरी येथे गुरुवारी बोलत होते. प्रचाराची सुरुवात करण्यापूर्वी रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकतेच दाखल झालेले माजी नगरसेविका सारिका लांडगे आणि संतोष लांडगे यांची भेट घेतली. तसेच शिवसेनेचे रवी लांडगे यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन भोसरीतील राजकीय समीकरणांवर चर्चा केली.
यावेळी रोहित पवार म्हणाले, "भोसरी मतदारसंघातील नागरिकांमध्ये परिवर्तनाची इच्छा दिसून येत आहे. भोसरीत सर्वेक्षणात अजित गव्हाणे यांना प्रचंड पाठिंबा मिळत आहे. उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणून अजित गव्हाणे यांना भोसरीतील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. येथील एकाधिकारशाही, भ्रष्टाचार आणि ठेके मिळवण्यासाठी दबाव पद्धती याला कंटाळलेले लोक आता परिवर्तनाच्या दिशेने आहेत."
शिवसेनेची साथ महत्त्वाची
भोसरी मतदारसंघात शिवसेना (उबाठा) पक्षाची साथ महत्त्वाची ठरली आहे. यासाठी सुलभा उबाळे, रवी लांडगे आणि सर्व शिवसैनिकांचे आभार रोहित पवार यांनी मानले. "महाविकास आघाडीच्या उमेदवार अजित गव्हाणे यांचा विजय निश्चित आहे," असे रोहित पवार म्हणाले.
गरीब माणसासाठी काय करता ते दाखवा - रोहित पवार
"उत्तर प्रदेशच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील काही नेत्यांमध्ये अराजकता वाढत आहे. महाराष्ट्र पुरोगामी विचारांचे ठिकाण आहे, आपल्याला महाराष्ट्र धर्म जपायचा आहे," असे सांगून रोहित पवार यांनी भाजपच्या नेत्यांना उद्देशून विचारले, "गरीब माणसाला तुमच्या धोरणांमुळे कोणती मदत मिळते, ते दाखवा."
" माझ्या मूळ स्वभावावर मी येईन" अशी वक्तव्य भाजपच्या उमेदवारांनी करणे म्हणजे तुम्ही स्वतःच्या तोंडून लोकांना सांगताय की तुमचा मूळ स्वभाव काय आहे. मुळात आम्ही सगळे परिवर्तनाची भूमिका समोर ठेवून एकत्र आलेलो आहोत. आज केवळ मी उमेदवार म्हणून विधानसभा निवडणुकीला सामोरे जात नाही.तर आमच्या सगळ्यांची भूमिका एक आहे. माझा प्रत्येक सहकारी, पक्षातला पदाधिकारी हा परिवर्तनाच्या मानसिकतेमध्ये आहे. ज्या पद्धतीने त्यांनी काल भाषण केले ते लोकांना आवडणारे नाही. विरोधकांची वक्तव्य पराभवाच्या नैराश्यातून पुढे येत आहेत. त्यांच्या वक्तव्यातून त्यांचा पराभव स्पष्ट दिसू लागला आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली असल्यामुळे ते अशी वक्तव्य करत असतील.- अजित गव्हाणे
Reviewed by ANN news network
on
११/०८/२०२४ ०३:२९:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: