उरण (प्रतिनिधी) - वनवासी कल्याण आश्रम उरण तालुका शाखेने यंदाच्या दिवाळीनिमित्त एक विशेष उपक्रम राबवला. तालुक्यातील पाच वाड्यांवर मिठाई आणि कपड्यांचे वाटप करून जनजाती बांधवांच्या दिवाळीला गोडवा दिला.
कोप्रोली वाडी, विंधने वाडी, कांठवली वाडी, जांभूळपाडा आणि वेश्वी वाडी या पाच ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कोप्रोली, विंधणे आणि जांभूळपाडा येथे नवीन कपड्यांचेही वितरण करण्यात आले.
विंधणेवाडीत बालसंस्कार वर्गातील विद्यार्थ्यांनी कवितांचे सादरीकरण करून आपले कलागुण दाखवून दिले. वेश्वी वाडीत एका तरुण कलाकाराने, अमित कातकरी याने बनवलेली मुरुड जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती पाहून उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला.
या कार्यक्रमादरम्यान वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष मनोज ठाकूर यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत शंभर टक्के मतदानाचे आवाहन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाला सहसचिव कुणाल शिसोदिया, कोकण प्रांत बालसंस्कार वर्ग प्रमुख सुनंदा कातकरी, ॲड. आकाश शाह यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. बीना इन्वेस्टरचे विपुल शहा, सुशील दर्णे आणि जितेंद्र पटेल यांनी या उपक्रमाला विशेष सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: