पुणे (प्रतिनिधी) - डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत गुरुवार, दि. १४ नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान जागृतीसाठी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेतील ११०० हून अधिक पालकांनी शाळेत हजेरी लावून मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली. या उपक्रमात प्रमुख भूमिका बजावणाऱ्या मुख्याध्यापिका कल्पना वाघ आणि शिक्षिका प्रिया इंदुलकर यांनी पालकांशी संवाद साधून त्यांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले.
विद्यार्थी आणि पालकांची मतदान जागृतीसाठी मानवी साखळी
शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी एकत्र येऊन मानवी साखळी तयार केली. या उपक्रमाच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना मतदान करण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. नागरिकांनी त्यांच्या मताधिकाराचा योग्य वापर करून आपले कर्तव्य पार पाडावे, यासाठी जागृती करण्यात आली.
विविध उपक्रमांचे आयोजन
१४ ऑक्टोबर २०२४ ते २४ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत शाळेत मतदान जागृती अभियानाअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये पालकांशी थेट संवाद साधण्यासाठी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मतदानाचे संकल्प पत्र लिहून घेण्यात आले. तसेच, शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांनी घोष फलकांसह प्रभात फेरी काढून नागरिकांपर्यंत मतदानाचे संदेश पोहोचवले.
घोषवाक्य लेखन आणि पालकांसाठी विशेष उपक्रम
विद्यार्थ्यांनी मतदान जागृतीवर आधारित विविध घोषवाक्यांचे लेखन केले. शाळेच्या माध्यमातून पालकांना जागरूक करण्यासाठी निबंध लेखन आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. याशिवाय विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांना पत्र लिहून त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित केले.
अभियानासाठी शिक्षकांचे महत्त्वपूर्ण योगदान
शिलासमिती अध्यक्ष राजेंद्र जोग आणि मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ शिक्षक तनुजा तिकोने, धनंजय तळपे, योगिता भावकर, पुष्पा देशमाने आणि समग्र शिक्षा अभियान विभागातील शिक्षकांनी या उपक्रमांचे नियोजन केले. या उपक्रमांच्या माध्यमातून शाळेने समाजात मतदानाच्या महत्त्वाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.
Reviewed by ANN news network
on
११/१४/२०२४ ०७:३६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: