पुणे : विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या पथकाने एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील साखळी हिसकावून नेल्याप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक केली असून त्याच्याकडून दोन देशी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
रफिक सलीम खान (वय ३६, रा. बि.०७, जीवलग हौसिंग सोसायटी, आयटीआय स्किम निगडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शास्त्री रोड येथे एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी हिसकावून नेल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सचिन कदम यांनी गोपनीय खबऱ्यांच्या माध्यमातून या गुन्ह्याचा छडा लावला. आरोपीच्या घरी छापा टाकून त्याच्याकडून चोरीस गेलेली साखळी, दोन देशी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, मारामारी असे अनेक गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त संदीपसिंह गिल्ल, सहा. पोलीस आयुक्त सईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक अरुण घोडके, पोलीस उप-निरीक्षक मनोज बरुरे यांच्यासह विशेष पथकातील कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: