पिंपरी (प्रतिनिधी): "पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्याचा निर्धार महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी केला असून, त्यासाठी आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसावी," असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.
आकुर्डी येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. "महायुतीच्या पाठीमागे उभा आहे आरपीआयचा गडी, मग का येणार नाही अण्णा बनसोडे यांची घडी," अशा कवितामय शैलीत त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.
या वेळी त्यांनी राष्ट्रीय पातळीवर आरपीआयच्या वाढत्या प्रभावाचाही उल्लेख केला. "मणिपूर, नागालँड, अंदमान-निकोबार, लक्षद्वीप येथे पक्षाची ताकद वाढत असून, विदेशातही अनेकजण पक्षासोबत जोडले जात आहेत," असे त्यांनी सांगितले.
महत्त्वाची घडामोड म्हणजे या मतदारसंघात इच्छुक असलेल्या आरपीआय महिला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे यांनी पक्षहितासाठी आपला अर्ज मागे घेतला. "सोनकांबळे यांनी केलेला त्याग मोलाचा असून, महापालिका निवडणुकीत आरपीआयला योग्य सन्मान दिला जाईल," असे आश्वासन आमदार बनसोडे यांनी दिले.
कार्यक्रमास माजी खासदार अमर साबळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश तरस, भाजपचे शहर कार्याध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
राहुल गांधी यांच्या मतमागणीच्या पद्धतीवर टीका करताना आठवले म्हणाले, "संविधानाला डाग लागू देणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या अखंडतेसाठी घेतलेली मेहनत वाया जाऊ देणार नाही."
Reviewed by ANN news network
on
११/१४/२०२४ ०२:४०:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: