मोदींच्या पुणे भेटीसाठी ३००० पोलिसांचा फौजफाटा
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ पुण्यात येत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलीस दलाने कंबर कसली आहे. एस. पी. महाविद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या जाहीर सभेसाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, केंद्रीय सुरक्षा दलाच्या विशेष पथकाने सर्व मार्गांची पाहणी पूर्ण केली आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले असून, चार अतिरिक्त पोलीस आयुक्त, दहा पोलीस उपायुक्त, २३ सहायक पोलीस आयुक्त, १३५ पोलीस निरीक्षक आणि ५७० पोलीस उपनिरीक्षकांसह विशेष पोलीस दल तैनात करण्यात येणार आहे.
लोहगाव विमानतळापासून सभास्थळापर्यंतच्या संपूर्ण मार्गावर विशेष शाखा, गुन्हे शाखेची पथके, वाहतूक पोलीस, श्वानपथक, बॉम्बशोधक आणि नाशक पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जंगली महाराज रस्ता, विमानतळ रस्ता आणि टिळक रस्ता परिसरात सोमवारी सकाळपासूनच विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा व्यवस्थेचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला असून, नागरिकांना सभास्थळी येताना सुरक्षा तपासणीला सामोरे जावे लागणार आहे.
सभेसाठी एक लाख लोकांची उपस्थिती अपेक्षित आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सभास्थळाची पाहणी केली. भाजप प्रदेश महामंत्री राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह अन्य नेत्यांनी तयारीचा आढावा घेतला.
सभास्थळी ७१ हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली असून, मैदान परिसरात आणि बाहेर स्क्रीनची सोय करण्यात आली आहे. तीन ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते या सभेस उपस्थित राहणार आहेत.
"पश्चिम महाराष्ट्रातील ५८ विधानसभा मतदारसंघांवर या सभेचा सकारात्मक परिणाम होईल," असे मोहोळ यांनी सांगितले. "पुणे जिल्ह्यातील २१ पैकी २१ जागा महायुतीकडे येतील असा आम्हाला दृढ विश्वास आहे," असेही त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान मोदी यांची मंगळवारी पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर आणि पुणे अशा दोन सभा होणार आहेत. सातारा आणि पुणे जिल्ह्यातील महायुतीचे सर्व उमेदवार या सभेस उपस्थित राहणार आहेत.
Reviewed by ANN news network
on
११/१२/२०२४ ११:३९:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: