उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाने सुटणार वाहतुकीचा प्रश्न
पुणे - बिबवेवाडी आणि मार्केट यार्ड परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी गंगाधाम चौकात मोठा वाहतूक प्रकल्प मंजूर करण्यात आला असल्याची माहिती भाजप-महायुतीच्या पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांनी दिली.
प्रकल्पाच्या नियोजनानुसार बिबवेवाडी ते कोंढवा रस्त्यावर ५२० मीटर लांब आणि १६ मीटर रुंद उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. आई माता मंदिर ते मार्केट यार्ड दरम्यान ४६० मीटर लांब व साडेतेरा मीटर रुंद ग्रेड सेपरेटर तसेच आई माता मंदिर ते झाला कॉम्प्लेक्स दरम्यान २४ मीटरचा स्वतंत्र रस्ता प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी ९३ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असल्याचे मिसाळ यांनी सांगितले.
"मार्केट यार्डमधील अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी या प्रकल्पामुळे सुटणार आहे. कात्रजहून बिबवेवाडीकडे जाण्यासाठी स्वतंत्र २४ मीटर रस्त्याचेही नियोजन करण्यात आले आहे," असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, पर्वती मतदारसंघातील प्रमुख रस्त्यांवर अॅडप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (एटीएमएस) कार्यान्वित करण्यात आली आहे. या स्वयंचलित वाहतूक सिग्नल प्रणालीमुळे वाहतुकीची गती वाढून नागरिकांचा वेळ वाचणार आहे. प्रदूषणातही घट होणार असल्याचे मिसाळ यांनी स्पष्ट केले.
मिसाळ यांच्या प्रचारार्थ प्रेमनगर, आंबेडकर नगर परिसरात प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी नगरसेविका मानसी देशपांडे, अनुसया चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
११/१२/२०२४ १०:५८:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: