"भोसरीत गव्हाणेंच्या गाठीभेटींना उत्स्फूर्त प्रतिसाद"
भोसरी (प्रतिनिधी): महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी शनिवारी भोसरी मतदारसंघात व्यापक जनसंपर्क केला. गाठीभेटींदरम्यान त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोलमडत असलेल्या कण्याबद्दल चिंता व्यक्त केली.
वीस वर्षांचा नगरसेवक म्हणून अनुभव असलेल्या गव्हाणे यांनी शहराच्या विकासाच्या संधी आणि आव्हानांबद्दल बोलताना गेल्या दहा वर्षांत शहराची ओळख पुसण्याचे काम झाल्याची टीका केली.
महापालिकेत अडीच वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या प्रशासकीय राजवटीमुळे लोकशाहीचा गळा घोटला जात असल्याचे त्यांनी म्हटले. सभा न होणे, ठराविक विषयांनाच मंजुरी मिळणे यामुळे शहराचे नुकसान होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, बहुजन कल्याण सेना महाराष्ट्र आणि जनशक्ती सामाजिक सेनेने गव्हाणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. गव्हाणे यांनी मतदारांना 'तुतारी वाजवणारा माणूस' या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले.
Reviewed by ANN news network
on
११/१६/२०२४ ०८:५७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: