सांगवीत 'रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी'चा जयघोष
पुणे (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ खासदार अमोल कोल्हे यांनी रविवारी चिंचवड मतदारसंघात भव्य बाईक रॅलीचे आयोजन केले. सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, काळेवाडी आणि रहाटणी परिसरात फिरलेल्या या रॅलीला स्थानिक युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
चार तास चाललेल्या या रॅलीदरम्यान 'रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी'च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. रॅलीच्या मार्गावर अनेक ठिकाणी नागरिकांनी स्वागत केले. साई चौकात जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली, तर पिंपळे गुरव येथे दोन ठिकाणी जेसीबीतून महाकाय हार अर्पण करण्यात आले.
रॅलीची सुरुवात सांगवीच्या साई मंदिरातील दर्शनाने झाली. त्यानंतर जुनी सांगवीतील अहिल्यादेवींचा पुतळा, गजानन महाराज मठ, वेताळ महाराज, नवी सांगवीतील म्हसोबा, महालक्ष्मी देवी आणि पिंपळे गुरवमधील भैरवनाथ यांचे दर्शन घेण्यात आले. रहाटणीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीची सांगता झाली.
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नवनाथ जगताप यांनी सांगवीकर घराणेशाहीला कंटाळले असून, यंदा परिवर्तन घडवण्याचा त्यांचा निश्चय असल्याचे सांगितले. तर उमेदवार राहुल कलाटे यांनी जनतेने ही निवडणूक हातात घेतली असून, बदलाची भावना जनमानसात असल्याचे म्हटले आहे.
रॅलीत मराठवाडा विकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, उद्योजक वसंत काटे यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
११/१०/२०२४ ०९:०४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: