"तीन कोटी भगिनींना लखपती बनवण्याचा संकल्प"
नांदेड, दि. (प्रतिनिधी) -देशातील वंचितांची उपेक्षा ही काँग्रेस व आघाडीची जुनीच नीती असून वंचितांचे अधिकार हिसकावून या समाजाच्या जातीजातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा काँग्रेस आघाडीचा डाव आहे, असा थेट हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नांदेड येथील महायुतीच्या विशाल प्रचारसभेत बोलताना चढविला. महाराष्ट्रात काँग्रेस आघाडीच्या या नीतीला थारा देऊ नका, महाराष्ट्राच्या गतिमान विकासाचा वेग कायम रहावा यासाठी महायुतीलाच पुन्हा एकदा सत्ता द्या, असे आवाहनही मोदी यांनी या प्रसंगी बोलताना केले.
जातीजातींमध्ये तेढ पेरण्याचा काँग्रेसचा डाव संघटितपणे उधळून लावला पाहिजे, यासाठी संघटित रहाल तर सुरक्षित रहाल असे सांगत,‘एक रहेंगे तो सेफ रहेंगे’ या आपल्या घोषणेचा मोदी यांनी या सभेतही पुनरुच्चार केला.काँग्रेस व त्यांच्या आघाडीला बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाविषय़ी द्वेष असून घोटाळ्यांच्या या मालिकेत काँग्रेसने आता आपलाच विक्रम मागे टाकला आहे. काँग्रेसचे लोक संविधानाच्या नावाने आपले एक स्वतंत्र पुस्तक वाटत आहेत. त्यावर भारताचे संविधान असे लिहिले असले तरी आतील सारी पाने कोरी असल्याचे लोकांच्या लक्षात आले आहे. हा काँग्रेसच्या घोटाळ्यांच्या मालिकेतील सर्वात मोठा घोटाळा म्हणावा लागेल, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढविला. बाबासाहेबांच्या संविधानातील एक शब्ददेखील या पुस्तकांत नाही. संविधानाच्या नावाने लाल पुस्तके छापायची,पण त्यातून संविधानाचे शब्द मात्र हटवायचे हा बाबासाहेबांचे संविधान संपविण्याच्या काँग्रेसी मानसिकतेचा नमुना आहे. या देशात ते बाबासाहेबांची नव्हे, तर आपली स्वतंत्र राज्यघटना प्रस्थापित करू पाहात आहेत. आपले स्वतंत्र संविधानपुस्तक छापून ते संविधानाची थट्टा करत आहेत, असेही श्री.मोदी म्हणाले.
गेल्या दहा वर्षांत आमच्या सरकारच्या अधिकाधिक योजनांच्या केंद्रस्थानी महिलांना स्थान दिले गेले आहे. प्रत्येक योजनेतून सर्वाधिक सुविधा महिलांना प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे आज गावागावातील आमच्या भगिनी लाखो रुपये कमावत आहेत, तीन कोटी भगिनींना लखपती दीदी बनविण्याचा आमचा संकल्प आहे. यापूर्वी देशात असे काही ऐकूदेखील येत नव्हते. आमच्या सरकारचा महिला विकासाचा संकल्प आहे, आणि महाराष्ट्रातील महायुती सरकारदेखील गावागावातील माताबहिणींना सक्षम बनविण्याच्या संकल्पासाठी कटिबद्ध आहे. माझी लाडकी बहीण योजनेला महिलांकडून मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. या योजना सक्षमपणे राबविण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांस विजयी करून महायुतीच्या सरकारला पुन्हा संधी द्या, असे आवाहन अखेरीस मोदी यांनी केले. नारीशक्तीचा सन्मान, सुरक्षा आणि सशक्तीकरणास आमच्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे, या ग्वाहीचा त्यांनी पुनरुच्चारही केला.
Reviewed by ANN news network
on
११/०९/२०२४ ०७:३८:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: