पुणे - शहरातील जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाला चालना मिळावी यासाठी १८ मीटरपेक्षा जास्त खोली असलेल्या भूखंडांवरील बांधकामासाठी साइड मार्जिनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर हा निर्णय झाल्याचे कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी सांगितले.
"पूर्वीच्या नियमांनुसार अनेक इमारतींना साइड मार्जिन न सोडता बांधकाम परवानगी मिळत होती. मात्र यूडीसीपीआर नियमावलीतील बदलानंतर १५ मीटरपेक्षा जास्त खोलीच्या इमारतींसाठी एक मीटर साइड मार्जिन सोडणे बंधनकारक करण्यात आले होते," असे रासने यांनी स्पष्ट केले.
शहरातील गावठाण भागात अनेक मिळकती १८ मीटरपेक्षा जास्त खोलीच्या असल्याने, वाड्यांचा पुनर्विकास करताना दोन टक्के अतिरिक्त प्रिमियम हार्डशीप आकारून साइड मार्जिनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना अग्निशामक यंत्रणा, वाहनतळासह इतर आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
महापालिका आयुक्तांनी काढलेल्या आदेशात पुरेशा सवलती नसल्याने पुनर्विकास अवघड झाला होता. मात्र उपमुख्यमंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न सुटला असल्याचेही रासने यांनी सांगितले.
Reviewed by ANN news network
on
११/१३/२०२४ ०८:३२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: