पुणे : पवन मावळातील शिवली गावात रविवारी रात्री एक दुर्मिळ खवले मांजर (इंडियन पेंगोलीन) आढळून आले. वन विभाग आणि वन्यजीव रक्षक, मावळ संस्थेच्या सदस्यांनी त्याला सुरक्षितपणे जवळच्या जंगलात सोडून दिले.
वन्यजीव रक्षकांच्या टीममध्ये अनिल आंद्रे, जिगर सोळंकी, शत्रुघ्न रासनकर, रोहित पवार, निलेश ठाकर, संतोष दहीभाते, आदेश मुथा आणि निखिल साने यांचा समावेश होता
घटनेची माहिती देताना वन्यजीव रक्षक अनिल आंद्रे यांनी सांगितले की, "शिवली येथील रमेश आडकर यांच्या अंगणात रात्री साडेनऊच्या सुमारास हे खवले मांजर आढळले. ग्रामस्थांनी त्याला पकडून ठेवले आणि आम्हाला कळवले. ते साधारण 30 किलो वजनाचे, 4 फूट लांबीचे होते."
इंडियन पेंगोलीन ही प्रजाती सामान्यतः डोंगराळ किंवा घनदाट जंगलात आढळते. मात्र या प्राण्याचे शिवली गावात आढळणे ही दुर्मिळ घटना आहे. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, कुत्र्यांच्या भीतीमुळे हे मांजर घरात शिरण्याचा प्रयत्न करत असावे.
वन विभाग आणि वन्यजीव रक्षक संस्थेने नागरिकांना असे दुर्मिळ प्राण्यांना आढळल्यास त्वरित वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवण्याचे आवाहन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: