पुणे : स्वारगेट परिसरात प्रवाशांना लुटणाऱ्या रिक्षाचालकांच्या टोळीला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सुमारे 100 ते 150 सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करून या गुन्हेगारांचा शोध घेतला.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये रोहित सुभाष चव्हाण (वय 23, रा. गंगानगर, भेकराईनगर, फुरसुंगी), मयुर उर्फ संकेत प्रकाश चव्हाण (वय 19, रा. मंतरवाडी, देवाची उरुळी) आणि सुदर्शन शिवाजी कांबळे (वय 22, रा. म्हाडा कॉलनी, वारजे माळवाडी) यांचा समावेश आहे. हे तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध सिंहगड रोड, बंडगार्डन, बिबवेवाडी, भारती विद्यापीठ आणि स्वारगेट पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
गुन्ह्याची घटना 27 ऑगस्टला रात्री साडेनऊ वाजता घडली. फिर्यादी तरुण स्वारगेट येथील पीएमपी बसस्टँडवरून रिक्षात बसला असता, रिक्षाचालकाने त्याचा मोबाईल मागितला. त्यानंतर रिक्षाचालकाने रिक्षा लुल्लानगर परिसरात नेऊन फिर्यादीकडील रोख 500 रुपये, गळ्यातील चांदीची साखळी आणि मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. तसेच 4000 रुपये ऑनलाइन मागवून घेतले.
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी 100 ते 150 सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण केले. मात्र गुन्हा रात्रीच्या वेळी घडल्याने त्यातून फारशी माहिती मिळाली नाही. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा शोध घेण्यात आला.
पोलिसांनी प्रथम रोहित चव्हाण याला त्याच्या राहत्या घराच्या परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत इतर साथीदारांचीही माहिती मिळाली. त्यानंतर उर्वरित दोघांनाही अटक करण्यात आली.
पोलिसांनी या कारवाईत चोरी केलेला माल आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
स्वारगेट पोलिसांच्या या कारवाईमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत आश्वासक वातावरण निर्माण झाले आहे. तरीही प्रवाशांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: