भोसरी : भोसरी विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापले असून, निवडणुकीच्या तोंडावर महत्त्वाचे राजकीय समीकरण बदलल्याचे दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षाचे माजी क्रीडा सभापती आणि माजी नगरसेवक लक्ष्मण सस्ते यांनी विद्यमान आमदार महेश लांडगे यांना 'रामराम' करून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाचे उमेदवार अजित गव्हाणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
मोशी परिसरात सस्ते कुटुंबाचा मोठा प्रभाव असल्याने, या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लक्ष्मण सस्ते यांनी गव्हाणे यांच्या प्रचार मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला असून, अन्य काही भाजप पदाधिकारीही गव्हाणे यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत.
लक्ष्मण सस्ते यांनी अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाबद्दल बोलताना म्हटले, "अजित गव्हाणे हे सुसंस्कृत, उच्चशिक्षित आणि या शहराशी नाते असलेले नेते आहेत. त्यांच्या कुटुंबाची तिसरी पिढी या भागाचे प्रतिनिधित्व करत आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी केलेल्या कामांवर कधीही गालबोट लागलेले नाही."
मोशी भागातील विकासाच्या समस्यांकडे लक्ष वेधून सस्ते म्हणाले, "रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधांसाठी आजही हा भाग वंचित आहे. अजित गव्हाणे यांच्याकडे या समस्या सोडवण्याची दूरदृष्टी आहे, म्हणूनच आम्ही त्यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरलो आहोत."
अजित गव्हाणे यांनी मोशी परिसरात प्रचारास सुरुवात केली असून, गावठाण भाग आणि नवीन हौसिंग सोसायट्यांमध्ये त्यांचा प्रभाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. सस्ते कुटुंबाचा पाठिंबा मिळाल्याने गव्हाणे यांची ताकद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या घडामोडींमुळे भोसरी मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत असून, पुढील काही दिवसांत राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.
Reviewed by ANN news network
on
१०/०५/२०२४ ०८:५९:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: