कामोठे : "विस्तारित गावठाण विकास व नियमन" या महत्त्वपूर्ण विषयावर नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त महासंघ संलग्न परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने शनिवारी एक विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले. सरोवर एन एक्स हॉलमध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमात अनेक मान्यवर व प्रकल्पग्रस्त नागरिकांनी सहभाग नोंदवला.
महासंघाचे अध्यक्ष भूषण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या चर्चासत्रात शासनाने नुकत्याच जारी केलेल्या निर्णयावर सखोल चर्चा करण्यात आली. ९५ गावातील प्रकल्पग्रस्तांची गावठाण व विस्तारित गावठाण क्षेत्रातील घरे नियमित करण्याच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले, मात्र जमीन मालकी हक्काची मागणी कायम ठेवण्यावर भर देण्यात आला.
परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांनी शासन निर्णयातील सकारात्मक बाजू मांडल्या. त्यांनी फ्री होल्ड जमीन मालकीचे फायदे व गावांच्या सुनियोजित विकासाबाबत महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाशी झालेल्या चर्चांचा आढावा घेतला आणि प्रकल्पग्रस्तांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले. अॅड. विजय गडगे यांनी शासन निर्णयातील काही त्रुटींकडे लक्ष वेधले आणि क्लस्टर योजनेबाबत आपल्या शंका व्यक्त केल्या.
चर्चासत्राअंती, प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांचा एक अंतिम मसुदा तयार करून तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर करण्याचे ठरले. सर्व सहभागींनी जमीन मालकी हक्काची मागणी कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला, तसेच शासन निर्णयातील सकारात्मक बाबींचे स्वागत करत काही सुधारणांची आवश्यकता असल्याचेही नमूद केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: