पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात दरवर्षी दसरा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, विशेषतः रावण दहन कार्यक्रमामुळे नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होते. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने या उत्सवाच्या आयोजनासाठी आवश्यक असलेल्या सुरक्षा नियमांची नियमावली जाहीर केली आहे.
महापालिकेने केलेल्या आवाहनानुसार, दसऱ्याच्या उत्सवात भाग घेणाऱ्या सर्व आयोजकांनी या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक आहे. यामध्ये रावण दहनासाठी उभारल्या जाणाऱ्या मुर्तींना आणि मंडपांना कोणत्याही ज्वलनशील वस्तूंच्या जवळ ठेवू नये, तसेच विद्युत रोषणाई करताना सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे. मंडप उभारताना आणि रोषणाई करताना अत्यंत सुरक्षित पद्धतीचा अवलंब करावा, असे स्पष्ट केले आहे.
सुरक्षा नियमावलीतील मुख्य मुद्दे:
- रावण मुर्तींची उभारणी: ज्वलनशील ठिकाणांसमोर, इलेक्ट्रिक सब-स्टेशन, पेट्रोल पंप किंवा हाय-टेंशन लाइनच्या खाली रावण मुर्तीची उभारणी टाळावी.
- बाहेर जाण्याचे मार्ग: गर्दीचे नियोजन लक्षात घेऊन पुरेशा रुंदीचे निकास मार्ग खुले ठेवणे आवश्यक.
- रस्त्यांची उपलब्धता: अग्निशमन वाहनांना मोकळा रस्ता उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, जो किमान ६ मीटर रुंदीचा असावा.
- विद्युत सुरक्षितता: मंडपातील सजावटीला संपर्क होणार नाही अशा प्रकारे विद्युत रोषणाई करावी.
- अग्निशमन यंत्रणा: प्रशिक्षित कर्मचारी आणि अग्निशमन यंत्रणा ठिकाणी तैनात ठेवणे अनिवार्य आहे.
महापालिकेच्या या नियमावलीमध्ये प्रत्येक १०० चौरस मीटर जागेत दोन अग्निशमन यंत्र ठेवणे आणि रावणाच्या उंचीच्या १०० मीटर अंतरावर बेरीकेटिंग उभारणे यासारख्या सुरक्षा उपायांचा समावेश आहे.
कोणत्याही अग्नि दुर्घटनेच्या वेळी नागरिकांनी अग्निशमन विभागाच्या टोल फ्री क्रमांक १०१ किंवा मोबाईल क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.
शहरातील उत्सव सुरक्षिततेच्या दृष्टीने साजरे करण्यासाठी महापालिकेने हे नियम घालून दिले आहेत. या नियमांचे काटेकोर पालन करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सहकार्य करावे, असे महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: