पिंपरी : शहरातील बेकरी, हॉटेल्स, आणि ढाब्यांमध्ये कोळसा व लाकूड जाळल्याने होणारे वायूप्रदूषण कमी करण्यासाठी स्वच्छ इंधनाचा वापर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या महापालिका सभेत या परिपत्रकास मान्यता दिली.
वाढत्या शहरीकरणाबरोबरच व्यावसायिक आस्थापनांमध्ये स्वयंपाकासाठी इंधनाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. अनेक ठिकाणी अजूनही कोळसा आणि लाकूड जाळून स्वयंपाक केला जातो, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण होते. या समस्येवर तोडगा म्हणून महापालिकेने ठरवले आहे की, हॉटेल्स, बेकरी, आणि ढाब्यांमध्ये फक्त वीज किंवा लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) किंवा नैसर्गिक वायूचा वापर केला जाईल. तसेच, इंधन म्हणून लाकडाचा वापर टप्प्याटप्प्याने बंद करण्यासाठी एक कृती आराखडा देखील तयार करण्यात येणार आहे.
कोळसा व लाकूड जाळल्याने हवेतील प्रदूषण घटकांचे प्रमाण वाढत असल्याने पर्यावरणास गंभीर धोका निर्माण झाला आहे. यामुळे कार्बन मोनोऑक्साईड, अस्थिर सेंद्रिय संयुगे, आणि इतर हानिकारक कण हवेत मिसळत आहेत, ज्याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: