महाविकास आघाडीच्या घटक पक्षातर्फे प्रितम म्हात्रे मैदानात; जासईत झाला भव्य मेळावा
उरण : उरण विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी आज जासई येथे मोठ्या जनसमुदायासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या वतीने त्यांनी ही उमेदवारी सादर केली.
पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते असलेले म्हात्रे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमास मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. दि. बा. पाटील हायस्कूलजवळील मैदानावर झालेल्या सभेत अनेक मान्यवरांनी संबोधित केले.
कार्यक्रमात जे. एम. म्हात्रे, आस्वाद पाटील, काका पाटील, नरेश घरत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. प्रितम म्हात्रे यांनी आपल्या भाषणात उरण मतदारसंघातील विविध समस्यांचा उहापोह केला. पाणी टंचाई, बेरोजगारी, रस्त्यांची दुरवस्था यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी सत्ताधारी आमदार महेश बालदी यांच्यावर टीका केली.
"जनतेची प्रामाणिक सेवा करण्यासाठी मी या निवडणुकीत उभा आहे. उरणच्या विकासासाठी मला बहुमताने निवडून द्या," असे आवाहन म्हात्रे यांनी उपस्थितांना केले. निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी झालेल्या या कार्यक्रमाने उरण मतदारसंघात राजकीय वातावरण तापले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: