पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी मासिक वेतन आणि बोनस देण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
अतिरिक्त आयुक्त इंदलकर यांनी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार, बोनस कायदा १९६५ च्या तरतुदींनुसार महापालिकेच्या विविध विभागांत कंत्राटी तत्त्वावर आणि मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीचा बोनस २४ ऑक्टोबर २०२४ पूर्वी देण्यात यावा. सर्व विभागप्रमुखांनी याबाबत कार्यवाही करून त्याचा अहवाल कामगार कल्याण विभागाकडे सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
महत्त्वाचे म्हणजे, बोनस देण्याची कार्यवाही न करणाऱ्या संबंधित विभागप्रमुख किंवा कंत्राटदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे इशाराही परिपत्रकात देण्यात आला आहे.
दिवाळी सणाचे महत्त्व लक्षात घेता, पिंपरी चिंचवड महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रमाणेच कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही बोनस मिळणार आहे. यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळी उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरी करता येईल.
कामगार कायद्यानुसार, कंत्राटी कर्मचाऱ्यांना दरमहा १० तारखेपूर्वी वेतन देणे आवश्यक आहे. १ नोव्हेंबरपासून दिवाळी सुरू होत असल्याने, महापालिकेने कंत्राटी व मानधनावरील कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन आणि बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेतील हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक लाभ मिळणार असून, त्यांच्या कुटुंबियांनाही दिवाळीचा आनंद लुटता येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: